Read in English / इंग्रजीत वाचा
आबाद रहेंगे वीराने शादाब रहेंगी ज़ंजीरें
जब तक दीवाने ज़िंदा हैं फूलेंगी फलेंगी ज़ंजीरें
क्या होगा जब दीवानों से नाता तोडेंगी ज़ंजीरें
— हाफीज मेरठी
मी हा लेख लिहायला घेतलाय आणि हाफीज मेरठीच्या या ओळी माझ्यात घुमतायत. आता काही दिवसांपूर्वी भारतातली सगळी समाज माध्यमं फक्त न् फक्त रक्तबंबाळ आणि जखमी भारतीय विद्यार्थ्यांच्या आक्रोशांनी भरलेली होती. भारतात इथल्या भ्रष्ट शिक्षणव्यवस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘जेन झी’ विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रुधूर सोडले; पाण्याचे फवारे मारले. काठ्यांना खिळे लावून निर्दयी लाठीचार्ज केला, विद्यार्थिनींचे कपडे फाटेपर्यंत त्यांना रस्त्यावरून खेचत फरपटत घेऊन गेले. आणि तरीही इतक्या प्रचंड दमनाचा सामना करूनही संघर्षशील विद्यार्थी, विविध आंबेडकरी-डाव्या-पुरोगामी संघटना आणि देशभरात लढणारी तमाम जनता संघर्षाच्या मैदानात दटून राहिली. त्या आशावादाचा सुगंध आज भारताच्या कानाकोपऱ्यात विविध संघर्षांच्या रूपात दरवळतोय. तो माझ्याही आत दरवळतोय. कारण या आशावादाशी आणि त्याला जोडून असलेल्या विद्रोहाशी माझंही खूप जुनं नातं आहे. अगदी २५ वर्षांपूर्वी मी कबीर कला मंचच्या माध्यमातून जात वर्ग स्त्री दास्य अंताच्या चळवळीत आलो तेव्हापासूनचं.
जगभरातले अगदी कुठलेही संघर्ष घेतले तरीही; त्याला जोडणारा दुवा म्हणजे आशावाद आणि विद्रोह. मग ते वर्तमानातलं जेन-झी आंदोलन असो; किंवा दिल्लीतल्या सिंघू सीमेरवरील किसान आंदोलन; एन.आर.सी., सी.ए.ए. संदर्भातला शाहीन बागांमधला संघर्ष असो, किंवा मग रोहित वेमुला, जिशा, चंपा, पायल तडवी, अनिता यांच्या संस्थात्मक हत्यांविरोधात झालेली विद्यार्थी आंदोलनं असोत; त्यासोबतच खैरलांजी, हाथरस, जवखेडा या दलित हत्याकांडांविरोधात झालेल्या जातीअंताच्या आंदोलनांमधून ऐकू येणारा आक्रोश या सगळ्याची नाळ एकमेकांशी जुडलेली आहे. आणि म्हणूनच अन्याय अत्याचाराविरोधात उठवलेले आवाज असे विखरून ऐकता येत नाहीत; कारण त्या प्रत्येक आक्रोशाचे स्थळ, काळ, संदर्भ, समूह, पद्धत वेगवेगळे जरी असले तरी त्यांची नाळ आशावादाने जोडलेली असते. आणि आशावाद हा राजकीय असतो.
इस्राइल आणि अमेरिकेच्या जुलूमी सत्तेच्या विरोधात बंड करणारी पेलेस्टाइन आणि गाझा मधली जनता हि आपल्या लढ्याची प्रेरणा कधी बनून जाते हे आपल्यालाही कळत नाही. हि परिस्थिती लढून बदलता येऊ शकते; हे जग बदलता येऊ शकतं; हि भावना रुजणं म्हणजेच आशावाद जी मानवी समूहाची आदिम प्रवृत्ती आहे.
या आशावादाच्या आधारेच विद्रोहाची कास धरत मी २०१३ ते २०१७ आणि २०२० ते २०२६ अशा दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये साधारण एकूण दशकभराचा तुरुंगावास काढला आहे. दोन्हीमध्ये झालेल्या अटका या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधिक कायद्याखाली झाल्या होत्या. या जुलुमी कायद्याचा वापर करून दमन लादून प्रतिरोधाचा आवाज दाबणं हे आजकाल खूप सर्रास सुरू आहे. या दोन्ही अटका त्याच संदर्भातल्या. दुसरा खटला एल्गार परिषद-भीमा कोरेगावचा, ज्यात माझ्यासहीत एकूण १६ कार्यकर्ते, बुद्धिजीवी, वकील यांना जेरबंद केलं गेलं. तर एका मागोमाग असे दोन प्रदीर्घ तुरुंगवास मी दोन-अडीच वर्षांच्या अंतराने कापले आणि जामीनावर बाहेर आलो. तर पहिल्या तुरुंगावसानंतर २०१७ मध्ये ज्यावेळी बाहेर आलो तेव्हा मी एक चित्रपट पाहिला त्याचं नाव होतं ‘द शॉशँक रीडम्पशन’ म्हणजेच शॉशँकमधून मुक्ती. २०२० मध्ये ज्यावेळी मला दुसऱ्यांदा अटक झाली त्यावेळी त्या तुरुंगवासात मला तगवून ठेवलेल्या ज्या अनेक बाबी होत्या त्यात या चित्रपटानेही एक महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. खरं तर १९९४ साली आलेल्या या चित्रपटावर आजपर्यंत खूप काही लिहिलं गेलंय. पण तरीही एक राजनैतिक बंदी म्हणून या चित्रपटाशी असलेलं माझं नातं मला अधोरेखित करावं वाटतंय.
सुधारगृह की कत्तलखाना ?

हि कहाणी आहे, अमेरिकेतल्या शॉशँक नावाच्या तुरुंगाची. मी जिथे कैद होतो ते होतं महाराष्ट्रातलं तळोजा मध्यवर्ती कारागृह. दोन्ही तुरुंगातला सांस्कृतिक आणि भौगोलिक फरक सोडला तर जेल प्रशासनाची अमानवीयता, जेल प्रशासनाचा भ्रष्टपणा, बेकायदेशीर धंदे, कैद्यांमधली बंदिस्तपणाची घुसमट, आणि कैद्यांची एकूण मानसिकता यात काहीच फरक नाहीये. तळोजा कारागृहातले काही अपवाद वगळता जितकेही तुरुंग अधीक्षक आणि तुरुंग अधिकारी आले ते चित्रपटातल्या अधिकाऱ्यांसारखेच खुंखार, अमानवीय, स्वार्थी आणि भ्रष्टाचारी होते.
चित्रपटाची सुरुवातच एका विदारक प्रसंगाने होते. काही शिक्षा लागलेले कैदी तुरुंगात नव्याने दाखल होतात. तुरुंगामध्ये दाखल करतानाची प्रक्रिया खूप अमानवीय असते, ती प्रक्रिया या चित्रपटात तंतोतंत दाखवली आहे. सांगायचा मुद्दा हा की, अंगावरचे कपडे काढून चार लोकांसमोर नागडं करणं आणि गोल फिरायला लावणं याची तीव्रता आपल्याला वाचून किंवा फक्त चित्रपटात बघून समजू शकत नाही. जे कैदी पहिल्यांदा हे अनुभवतात त्यांच्या आत सुरू असलेलं वादळ हे इतकं सहजासहजी शमून जाऊ शकत नाही.
त्यामुळे पहिल्याच दृश्यामध्ये जेलच्या आत शिरताच हि सगळी प्रक्रिया आणि तुरुंगातलं विकृत वातावरण बघून चित्रपटातला एक कैदी वेडापीसा होतो. मानसिकरीत्या तो कोसळतो; घरी जाण्यासाठी आक्रोश करू लागतो. त्याला त्या असहाय्यतेतून सावरण्याच्या ऐवजी स्वतःला ‘सुधारगृह’ म्हणवणाऱ्या तुरुंगातले वरिष्ठ अधिकारी त्याला खाली पाडून लाथा बुक्के घालून मरेस्तोवर मारतात. रात्रभरात वेदनांनी विव्हळत तो कैदी तुरुंग इस्पितळात मरतो. थंड डोक्याने केलेले हे खून पाहून हे अतिरंजित वाटण्याची शक्यता टाळता येत नाही, पण हे वास्तव आहे. आणि हे तुरुंगातल्या माझ्या साधारण दशकभराच्या प्रदीर्घ तुरुंगावसाच्या अनुभवावरून मी ठामपणे सांगू शकतो.
तुरुंगात असताना मी अमानुषतेचे असे अनेक किस्से अनुभवलेले आहेत. जनावरांवर मनस्वी प्रेम करणारा तुरुंग अधिकारी कैद्यांच्या मानवीयतेबाबत मात्र प्रचंड उदासीन किंवा नकारात्मक असलेला मी बघितलेला आहे. तुरुंगातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे काहीही मोठे कारण नसताना कैद्यांचा मृत्यू होण्याच्या घटना मी अनुभवल्या आहेत. माझ्या बराक मध्ये शेजारी असलेला एक म्हातारा कैदी पोटदुखीने परेशान झाला होता रात्री आम्ही कैद्यांनी आरडाओरडा केल्यावरही डॉक्टर आला नाही, खूप उशिरा नर्सिंग शिपाई येऊन पेनकीलर गोळी देऊन गेला. (पॅरासीटेमोल आणि डायक्लोफिनॅक गोळ्या देऊन काम निपटवणे हा तुरुंगाचा पॅटर्न असतो) मात्र या गोळ्यांनी फरक पडला नाही तेव्हा तुरुंगाच्या हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केले. तिथून योग्य उपचारांसाठी त्याला बाहेर मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे होते मात्र ते काहीच केले नाही. विशेष म्हणजे तेव्हा बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये पैशांच्या (लाच) बदल्यात इतर काही विशेष सुविधा असणाऱ्या कैद्यांना पाठवले जात होते. परिणामी तीन दिवस तो कैदी तडफडत राहिला आणि शेवटी तिथेच तो मेला. ‘तुरुंगात मेला’ असे समोर येऊ नये म्हणून मग त्याचा मृतदेह पहाटे पहाटे बाहेरच्या हॉस्पिटलसाठी पाठवला गेला आणि ‘वाटेत तो कैदी मरण पावला’ असे चित्र बनवण्यात आले. ही घटना मला समजली, मी यासंदर्भात काही माहिती गोळा केली आणि याविरोधात राज्य मानवाधिकार आयोगाकडे रीतसर तक्रार केली. मात्र त्या तक्रारीचे टिकणे अवघड होते कारण मी त्याच तुरुंग प्रशासनाच्या अखत्यारीत बंदिस्त होतो ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली होती. मी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करून मागवलेली कागदपत्रं मला देण्यात आली नाहीत. राज्य मानवाधिकार आयोगाच्या सुनावणीच्या तारखा जाणीवपूर्वक माझ्यापासून लपवण्यात आल्या. साक्षीदार असलेल्या सोबतच्या कैद्यांवर विविध प्रकारे दबाव टाकण्यात आला. त्यामुळे त्या तक्रारीचा निभाव आयोगात लागू शकला नाही.
याच संदर्भातली एक वेदनादायी आणि संतापजनक घटना म्हणजे एल्गार भीमा कोरेगाव खटल्यातील माझ्या एका सहआरोपींच्या बाबतीतली. तुरुंगात कुठेही भेटल्यावर असं हात उंचावून मूठ वळवून कापऱ्या आवजात “लडेंगे जितेंगे” म्हणणारे महान मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यु हीसुद्धा एक संस्थात्मक हत्या होती. आम्ही एल्गारबंद्यानी या संस्थात्मक हत्येचा निषेध म्हणून एक दिवसीय उपोषण आणि या हत्येस जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रारही केली होती. या तक्रारीचे पुढे काही विशेष झाले नाही हे एक विदारक वास्तव आहे.
कैद्यांसोबत अशा क्रूरतेने वागताना तुरुंग प्रशासन हि सबब देते की, ‘कैदयांसोबत मानवीयतेने वागल्यास त्यांना तुरुंग हि एक शिक्षा आहे असं वाटणार नाही’. हे असं बोलताना त्यांना तुरुंग विभागाला “महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा असे म्हटले जाते आणि त्यांच्या बोधचिन्हावर त्यांचे ध्येय हे ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ असे आहे याचाही त्यांना विसर पडलेला असतो. त्यामुळे शिस्त आणि अंतर्गत सुरक्षा या नावाखाली तुरुंग प्रशासन मनाला वाटेल तसे आणि क्रूरपणे वागत असते.
एकदा तळोजामध्ये रात्री उशिरा राऊंडला आलेल्या एका सणकी अधिकाऱ्याला काही कैदी जागे असलेले दिसले. अगरबत्तीची खूपसारी पाकीट जमा करून त्यापासून बनवलेल्या कार्डांनी ते पत्ते खेळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अधिकाऱ्याने त्यांना समोर उपस्थित राहण्यासाठी बजावले आणि सकाळी पिसाळलेल्या जनावरागत तो त्या कैद्यांवर तुटून पडला. हातातल्या काठीने इतके मारले की त्यातला एक कैदी गंभीर जखमी होऊन दोन दिवसांनी मेला. शव विच्छेदन अहवाल व्यवस्थित सोयीप्रमाणे बनवून, तो कैदी घसरून पडला आणि मेला असे सहज दाखवले. एक खून सहज पचवला तुरुंग प्रशासनाने. ज्याने तो खून केलेला असतो त्या अधिकाऱ्याला या गोष्टीचा जराही पश्चाताप नसतो उलट तो अशा मिटवामिटवीमुळे आणखी क्रूर आणि बिनधास्त बनतो.
एखादंच उदाहरण भायखळा महिला कारागृहासारखं सापडतं; जिथे महिला अधिकारी आणि काही हवालदार यांच्या अमानुष मारहाणीत एका महिला कैदीचा मृत्यू झाला आणि त्या गुन्ह्यात त्यांना तुरुंगावासात जावे लागले. हे असे होऊ शकते अशी शक्यता असतानाही जेल प्रशासन कैद्यांना मारहाण करण्याचे थांबवत नाही; कारण असे बरेच खून पचवण्यात याआधी तुरुंग प्रशासन यशस्वी राहिलेले असते.
तुरुंगातला तुमचा प्रत्येक क्षण हा सकारात्मक आणि नकारात्मक याच्या द्वंद्वाने भरलेला असतो. तुरुंगात रोज काहीतरी नवीन आणि त्रासदायक घडत असते तिथे. मग त्या मर्यादीत अवकाशात पसरण्यासाठी अगदी लहान लहान गोष्टींसाठीही तुम्हाला चिवटपणे लढत राहावं लागतं. असाच चित्रपटात एक किस्सा दाखवालाय ज्यामध्ये नायक ‘अँडी’ पुस्तकांसाठी तुरुंग प्रशासनाच्या खूप जास्त मागे लागलेला असतो आणि प्रशासन मदत करण्यासाठी जराही इच्छूक नसते. त्यामुळे ‘अँडी’ सरकारच्या तत्सम विभागाला पत्र लिहायला सुरू करतो. तब्बल सहा वर्षं तो सतत पत्र पाठवत राहतो. सहा वर्षांनी त्याच्या पत्रांना यश मिळतं आणि सरकार काही पैसे आणि काही जुनी पुस्तकं पाठवतं.
आधीच्या वेळी म्हणजे २०१३ ते २०१७ असं तुरुंगात असताना मला जी पुस्तके वाचायची होती ती बाहेरून माझ्या खर्चाने मागवण्याची परवानगी तुरुंग अधीक्षक देत नव्हते. तेव्हा मला त्याच्या परवानगीसाठी न्यायालयाकडे जावे लागले होते. प्रशासनाने तुरुंगाच्या वाचनालयात पुरेशी पुस्तकं आहेत असं सांगत माझ्या अर्जाला विरोध केला. पण, तुरुंग प्रशासनाने दाखल केलेल्या पुस्तकांच्या यादीचे पुनर्वलोकन करून माननीय न्यायाधीशांनी माझा अर्ज मंजूर केला कारण त्यांना हे लक्षात आलं की त्या यादीतल्या पुस्तकांमध्ये विशेष असं काही नाही.
ज्या न्यायमूर्तींनी तो आदेश दिला ते न्यायमूर्ती बी. एच. लोया होते. २०१४ मध्ये ते राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सोहराबुद्दीन शेख प्रकरणाची सुनावणी करत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूवर नंतर सार्वजनिक स्तरावर वाद निर्माण झाला आणि चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकाही दाखल करण्यात आल्या. पण प्रत्येक वेळी तुम्हाला असे विवेकी आणि तर्कशील न्यायाधीश मिळतीलच असे नाही. इतका संघर्ष करून पुस्तकांबाबत न्यायालयाचा आदेश मिळवल्यानंतरही एकदा एका अधीक्षकाने एक पुस्तक दरवाज्यातून सोडले नाही. ते त्याने जप्त करून घेतले कारण इतकेच की त्या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये “गुलाम” आणि “विद्रोह” असे शब्द होते म्हणून. अशा विचित्र वास्तविकतेमध्ये तुम्हांला तुमच्या वाचनाअभावी होणाऱ्या घुसमटीला बाजूला सारत प्रशासनाशी अँडीसारखं कधी एकाकीपणे तर कधी संघटितपणे लढत राहावं लागतं.
“ब्रूक्स इथे रहायचा”

या चित्रपटात ब्रूक्स हाल्टन हे ८० वर्षाचं एक पात्र दाखवलं आहे. या पात्राच्या चित्रपटातल्या प्रवेशापासूनच ते अगदी शेवटपर्यंत हा म्हातारा संपूर्ण चित्रपटभर आपल्या आत घुमत राहतो. चित्रपट संपल्यानंतरही तो आपल्या आतून जात नाही. ब्रूक्सला वाचनालय सांभाळण्याचं काम दिलेलं असतं. तुरुंगाचं वाचनालय हेच मग त्याचं जग बनून जातं; त्या जगात तो म्हातारा पूर्णतः एकजीव होऊन जातो. हे काम ब्रूक्स इमाने इतबारे करत असतो. सगळ्या कैद्यांच्या नजरेत ब्रूक्सबद्दल एक आदर असतो. आत्मीयता असते.
ब्रूक्सने तुरुंगात एक कावळा पाळलेला असतो. जेक. जेकशी त्याचं घट्ट नातं असतं. बाहेरच्या जगात एखादा प्राणी किंवा पक्षी पाळणं हि गोष्ट अगदी सहज असते. पण तुरुंगात या गोष्टीचा आयाम बदलून जातो. आणि खास करून ज्यांच्या आयुष्यात तुरुंगाच्या बाहेर कोणीही जीवाभावाचं नाही त्यांच्यासाठी तर ते प्राणी किंवा पक्षी संवादाचं, एकांताला वर डोकावू न देण्यासाठीचं माध्यम बनून जातात.
एक शिक्षा लागलेला कैदी म्हणून ५० वर्षं काढता काढता तो त्या तुरुंगालाच त्याचं घर म्हणून बघू लागतो. अचानक एक दिवस मूल्यमापन करणाऱ्या समितीकडून ब्रूक्सला मुक्त करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतं आणि हे ऐकल्यानंतर ब्रूक्स हादरतो. त्याच्यासाठी आता बाहेरचं जग अनोळखी झालेलं असतं. ५० वर्षांच्या कोंडवाड्याची झालेली सवय त्याची हक्काची जागा कधी बनते हे त्यालाही कळत नाही. मग त्याच तुरुंगात राहण्यासाठी तो एका कैदयाच्या मानेवर सूरा धरतो हा विचार करून की याचा खून केल्यावर तरी मला शिक्षा म्हणून इथेच राहता येईल. पण बाकीचे कैदी त्याला त्यापासून परावृत्त करतात आणि मग नाईलाजाने ब्रूक्स आपला एक ब्रीफकेस एवढा संसार हातात घेऊन हतबलतेने तुरुंगाच्या बाहेर पडतो.
ब्रूक्स जेव्हा बाहेर पडतो तेव्हा बाहेरचं जग त्याच्यासाठी न थांबता ५० वर्षांनी पुढे निघून गेलेलं असतं. त्याला एका दुकानात काम करण्याची संधी दिली जाते तो तिथेही मेहनतीने काम करत असतो पण संध्याकाळ आणि रात्र त्याला खायला उठते. तो वाट बघत राहतो की तुरुंगातून बाहेर पडताना त्याने त्याच्या ज्या जेकला (कावळ्याला) आकाशात स्वच्छंद भरारी घेण्यासाठी सोडलंय तो जेक तरी त्याला कधीतरी भेटेल. पक्षांच्या थव्यात तो त्याच्या जेकला शोधत असतो पण तोही त्याला सापडत नाही.
शेवटी त्या एकांतपणाच्या घुसमटीला आणि प्रचंड अस्वस्थतेला कवटाळतच एक दिवस ब्रूक्स फाशी घेऊन मरतो. आणि मरणाआधी हातातल्या सुऱ्याने तिथल्या त्या लाकडी वाश्यावर कोरून जातो की “brooks was here”/“ब्रूक्स इथे रहायचा”. पुढे जगण्यासाठीच काहीच दिसत नाही त्याला. त्याच्या जगण्यातला आशावाद संपून जातो आणि त्याला आशावाद देणारं असं कुणीच जवळ नसतं. त्यामुळे जगण्यापेक्षा तो मृत्यूला जवळ करतो.
मग त्याच्या मरणाला जबाबदार कोण ? त्याच्या मरणाला जबाबदार म्हणजे तिथली अमानवीय सत्ताधारी व्यवस्था. एकूणच भांडवलशाहीमुळे प्रचंड स्व-केंद्री आणि व्यक्तिवादी झालेली समाजव्यवस्था जिला व्यक्तीच्या जीवाचं मोल नाही. जी व्यक्तीला यंत्रमानव समजते. भावना नसलेला यंत्रमानव.
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाशी, जिवंतपणाशी, या व्यवस्थेचा काहीही संबंध नसतो. त्यांना त्यांच्या व्यवस्थेला हाकायला ब्रूक्स सारख्या म्हाताऱ्यांचे फक्त श्रम हवे असतात. ब्रूक्सचं भावविश्व या यांत्रिक जगाशी मेळ खात नाही. हि चूक त्याची नाही. हि चूक आहे त्याच्यासाठी एक सशक्त भवताल बनवू न शकणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेची.
जे वैयक्तिक ते राजकीय
सत्ताधाऱ्यांची अशी खुलेआम व्यवस्थात्मक हिंसा आणि तुरुंगात असतानाची जखडबंद अवस्था अनेक वेळा तुम्हाला हतबलही करते. पण मग तुरुंगाच्या आतले आम्ही राजनैतिक बंदी अशा अवस्थेवर मात करायचो ते म्हणजे राजकीय विचारांप्रती असलेल्या कटिबद्धतेमुळे. पण या चित्रपटात अशी राजकीय कटिबद्धता असलेलं कोणतंच उदाहरण दिसत नाही. पण तरीही त्यातले अनेक प्रसंग, अनेक संवाद आपल्याला निःशब्द करून जातात. ‘जे वैयक्तिक ते राजकीय’ हे मानणाऱ्या मला हे संवाद, हे प्रसंग देखील राजकीयच वाटलेत.
चित्रपटाचा बंडखोर नायक अँडी ड्युफ्रेन एकदा एका तुरुंग अधिकाऱ्याच्या कार्यालयात जातो, तिथे एक दुसरा अधिकारी त्याला काही काम सांगून निघून जातो; काम करता करता अचानक आजूबाजूला अधीक्षक आणि इतर कोणीही तिथे नाहीये हे पाहून अँडी समोरच्या ग्रामोफोनवर मोझार्टच्या संगीताची एक सिडी लावतो. तिथल्या अधिकाऱ्याच्या धमकावण्याला काडीचीही किंमत न देता अँडी त्याला एकट्याला ऐकू येणारं “ले नोस्से दि फिगारो” मधली ती “सूल्ल एरिया”ची धून, ते संगीत आता संपूर्ण तुरुंगासाठी खुलं करतो. तुरुंगातले सगळे भोंगे ज्यामधून आतापर्यंत फक्त कैद्यांना गुलामीत ठेवणाऱ्या सूचना दिल्या जायच्या आज ते भोंगे इटालियन ऑपेराच्या संगीताने निनादू लागतात.
सगळे कैदी हातातली कामं टाकून त्या सुंदर संगीताभोवती एकवटले जातात. अँडी अधीक्षकाच्या खुर्चीवर बसून रेलत पाय समोरच्या टेबलावर ठेवतो आणि त्या संगीताचा आनंद लुटत असतो. तो दरवाज्याजवळ धावून येणाऱ्या त्या अधिकाऱ्यांची पर्वा करत नाही कारण तो दरवाजा त्याने आधीच हुशारीने आतून बंद केलेला असतो. इतक्या सुंदर क्षणाला जगण्याची किंमत काय चुकवावी लागेल हे अँडीला चांगलंच माहित असतं आणि तरीही तो हे करतो. आणि फक्त स्वतःसाठी नाही तर तुरुंगातल्या प्रत्येक कैद्यासाठी करतो. आणि तेही त्या काचेच्या दरवाज्याच्या बाहेर उभ्या असलेल्या तुरुंग अधीक्षकाच्या खुंखार नजरेला स्वतःच्या मार्मिक हास्याने कोलत. त्या नजरेत आशावाद, विद्रोह, सृजनाचा आनंद, समष्टीसोबतचा एकजीवपणा याचं एक भन्नाट रसायन असतं. एक सांस्कृतिक कार्यकर्ता कलाकार आणि राजकीय बंदी म्हणून मला हे रसायन भन्नाट वाटलंय. हे रसायन म्हणजे हा चित्रपट. हे रसायन म्हणजे आयुष्य. भल्या भल्या सत्ता कोसळवल्यात या रसायनाने. भारताच्या संघर्षशील मातीत हे रसायन रुजताना मी पाहतोय गेल्या काही दिवसांत. कृत्रिमपणे नाही. एका जैविकतेतून.
“सुधार? हा बकवास शब्द आहे”
चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शक ‘फ्रँक डॅरॅबॉन्ट’ यांनी एक प्रसंग चितारलाय जो आपल्याला अंतर्मुख करतो. ‘एलीस बॉयड रेडिंग’ ज्याला ‘रेड’ म्हणून हाक मारत असतात; तो कैदी तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ज्या बंडखोरीने सामोरा जातो जे त्याने त्याच्या ४० वर्षांच्या तुरुंगवासात कधीही केलेलं नसतं. ब्रूक्सला जसं ५० वर्षांनी मुक्त केलेलं असतं; त्याच पद्धतीने रेडची मुलाखत घेण्यासाठी समितीचे लोकं येतात.
यापूर्वी रेडने अशी मुलाखत दर दहा वर्षांच्या टप्प्यांनी ३ वेळा दिलेली असते आणि प्रत्येक वेळी त्याच्या शिक्षा माफीचा अर्ज समितीने रद्द केलेला असतो. यावेळी मात्र रेड जेव्हा त्या समितीसमोर जातो तेव्हा आधीपेक्षा पूर्ण वेगळा असतो; एक खंबीर, अनुभवी आणि बंडखोर कैदी.
जेव्हा त्याला विचारलं जातं की त्याच्यात सुधार आला आहे का; त्यावेळी रेड त्या मुलाखत घेणाऱ्याला म्हणतो की माझ्यासाठी हा फक्त एक राजकारणी वापरत असलेला शब्द आहे आणि तो यासाठी बनवला गेलाय कारण तुझ्यासारखे तरुण सूट आणि टाय घालून नोकरी मिळवू शकतील. “सुधार? हा बकवास शब्द आहे.” रेडने दिलेलं उत्तर आणि त्यानंतर त्या खोलीत पसरलेली क्षणभराची शांतता हे प्रतिबिंब आहे एकूणच तुरुंग व्यवस्थेच्या अमानवीयतेचं, कैद्यांच्या पुनर्वसनाच्या आणि सुधारणावादाच्या सामाजिक दांभिकतेचं, रेडला त्याच्या अनुभवातून गवसलेल्या प्रगल्भतेचं. रेड ज्या मानसिक घुसळणीतून गेला आहे तशीच घुसळण थोड्या बहुत फरकाने तुरुंगातल्या प्रत्येक कैद्याची होत असते.
कैद्यांना अशी सरसकट ‘कैदी’ म्हणून ओळख बाहेरच्या जगात असेलही पण तुरुंगात प्रत्यक्षात असं नसतं. तुरुंगातल्या प्रत्येक कैदयाला वर्ग-जात-धर्म-लिंग-प्रांत-भाषा या भिंती विभाजित करत असतात. कारण प्रत्येक कैदी हा बाहेरच्या याच ब्राह्मणी, भांडवली, पुरुषसत्ताक समजव्यवस्थेचा भाग असतो. याशिवाय गुन्ह्यांच्या प्रकारावरूनही कैदी विभागले जातात. तरीही हे सगळे कैदी तुरुंगात एकाच छताखाली जगत राहतात. यांच्यातल्या काहींवर झालेले आरोप हे काही वेळा पूर्णपणे आधारहीनही असतात पण तरीही ते त्या गुन्ह्यात नाहक ओढले जातात अशीही अनेक उदाहरणं आहेत. यातल्या प्रत्येकच कैद्याला बाहेरून काही मदत मिळतेच असं नाही. अनेकांना मदत करणारं कोणीच नसतं किंवा न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीत काही सकारात्मक उरलेलंही नसतं. तरीही एक धागा धरून ते जगत राहतात तुरुंगाच्या त्या प्रचंड आव्हानात्मक वातावरणात. अशा सगळ्या कैद्यांना जोडणारा तो धागा, आशावादाचा आणि दिवसागणिक ते करत असलेल्या जगण्यासाठीच्या संघर्षाचा असतो. मला अशा जिवंत लोकांमधून आशावाद आणि संघर्षाची उर्जा भेटत राहिली तुरुंगात.
त्या समितीसमोर तशी बंडखोरी करूनही ती समिती रेडची शिक्षा माफ करते आणि त्याला तुरुंगातून मुक्त करते. तुरुंगातून तब्बल ४० वर्षानंतर सुटल्यावर रेडचं आयुष्य अगदी ब्रुक्स सारखंच प्रचंड गुदमरून गेलेलं आणि साचेबद्ध होऊन जातं. आणखीन एक यंत्रमानव. बाहेर सुटल्यानंतर ज्या खोलीत ब्रूक्सने फाशी घेतलेली असते तीच खोली रेडला राहण्यासाठी देण्यात येते. त्या आधी त्या खोलीत तुरुंगातून मुक्त झालेल्या अनेक कैद्यांनी स्वतःला दोरखंडाच्या फासात बंदिस्त केलेलं असतं. आणि आता रेड त्या वास्तवाच्या दिशेने पुढे सरकत असतो. आणि अशा काळात चित्रपटाच्या नायकाचे म्हणजे अँडीचे शब्द त्याच्यापर्यंत पत्रातून पोहोचतात. “उम्मीद अच्छी नहीं, सबसे अच्छी चीज होती हैं, और अच्छी चीज मरा नहीं करती…” रेड त्या वाक्याला घेऊन त्या पत्रातल्या अँडीने शब्दशः दाखवलेल्या रस्त्यावर त्या दिशेने चालत राहतो आणि शेवटी एका शांत समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहोचतो. आणि चित्रपट संपतो.
जिथे तुरुंगच नसतील……
चित्रपट पटलावर संपतो. मात्र आपल्या मनात सुरू झालेलं कथानक थांबत नाही. ते सुरूच राहतं. रेडला त्या अथांग समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर कदाचित ती अपेक्षित निवांतता मिळते. परंतु माझं तुरुंगावासातून बाहेर पडतानाचं, पडल्यानंतरचं वास्तव, सुटतानाचा तो क्षण रेडच्या शेवटच्या क्षणापेक्षा नक्कीच वेगळा राहिला. तुरुंगाच्या त्या मोठाल्या दाराच्या उंबरठ्यात मी सुख-दुःखाचं द्वंद्व घेऊन उभा होतो. साडे पाच वर्षांच्या प्रदीर्घ तुरुंगावासानंतर मी माझी जीवनसाथी हर्षालीच्या सहवासात निवांत राहू शकणार होतो; ती तुरुंगाच्या गेटात मला न्यायला येणार होती. तिच्यासोबत चळवळीचे जिवाभावाचे अनेक साथी भेटणार होते. पण त्याचवेळी हळूहळू गडद होत जाणारं दुःख जास्त अस्वस्थ करत होतं. एल्गार भीमा कोरेगाव खटल्यातील माझे नंबरकारी ॲड. सुरेंद्र गडलिंग यांचा त्यावेळी जामीन झालेला नव्हता. ॲड. सुरेंद्र गडलिंग. ज्यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या वकिली आयुष्यात कैद्यांचे थवेच्या थवे मुक्त केलेत ते स्वतः आजही तळोजा मध्यवर्ती तुरुंगात जेरबंद आहेत.
चित्रपटात आशावाद जागवणारा आणि जुलुमी व्यवस्थेविरोधात बंडखोरी करणारा नायक हा अँडी होता. मी माझ्या चळवळीच्या आयुष्यात असा एक नाही तर असे अनेक अँडी अनुभवलेत. जात वर्ग स्त्रीदास्य अंताच्या क्रांतिकारी चळवळीत शत्रूशी लढत शहीद झालेल्या आणि कुठल्याही भयाण परिस्थितीत या चळवळीची वाट न सोडलेल्या त्या सर्वच ज्ञात-अज्ञात मुक्तीयोद्ध्यांमध्ये मला तो आशावाद आणि तो विद्रोह सापडला आहे.
चित्रपटात दाखवलेला हा तोच आशावाद होता ज्या आधारे बाहेरच्या अनेक आंतर्विरोधांशी मला संघर्ष करायचा होता. त्या काहीशा गोंधळलेल्या, भावनांनी गच्च भरलेल्या, आशा- निराशेच्या वातावरणातही तुरुंगाच्या गेटात घ्यायला आलेल्या त्या सगळ्या लोकांसोबत मला उद्याची एक आश्वासक चळवळ उभी राहताना दिसत होती. आमचा कारवाँ मला तुरुंगाच्या त्या भल्यामोठ्या भीतींपासून आणि लाल गेटापासून घेऊन चालला होता एका आझाद जिंदगीच्या दिशेने. माझं मन तुरुंगाच्या आत आणि तुरुंगाच्या बाहेर अशा धांदलीत तरीही अडकून होतं. गेली साडेपाच वर्षं संध्याकाळी सहानंतर टाळे लाऊन बंदिस्त केला जाणारा मी आज बंदिस्त नव्हतो, खुला होतो. माझ्या लोकांसोबत होतो. नजरेआड होत जाणारे त्या तुरुंगातील ॲड. गडलिंग सर नक्कीच सुटून येणार होते आणि उध्वस्त विखुरलेल्या राखेतून आमच्या चळवळीचा फिनिक्स पुन्हा भरारी घेणार होता. आणि तो हेच सांगणार होता की, या आशावादच्या आणि विद्रोहाच्या साथीनं एक दिवस एक-दोन कैद्यांना नाही तर संपूर्ण देशाला, जगाला या फॅसिजमच्या तुरुंगातून मुक्त करता येऊ शकतं. एक असं जग जिथे तुरुंगंच नसतील…

SUPPORT US
We like bringing the stories that don’t get told to you. For that, we need your support. However small, we would appreciate it.
Related Posts