BK-१६ जेल डायरी: नव-पेशवाई तुरुंग व्यवस्थेविरोधातलं एल्गार कैद्यांचं बंड – रमेश गायचोर यांच्या जगण्यातून
To mark six years of the arbitrary arrests and imprisonment of political dissidents in the Bhima Koregaon case, The Polis Project is publishing a series of writings by the BK-16, and their families, friends and partners. (Read the introduction to the series here.) By describing various aspects of the past six years, the series offers a glimpse into the BK-16’s lives inside prison, as well as the struggles of their loved ones outside. Each piece in the series is complemented by Arun Ferreira’s striking and evocative artwork. (This piece has been translated into English by Vernon Gonsalves here, and into Hindi by Prashant Rahi here.)
जिन्हें नाज़ है हिन्द पर उनको लाओ
जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहां हैं ??
या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही वर्षांनंतर लिहिलेल्या साहिर लुधियानवी यांच्या या ओळी आजही भिनल्यात आत. पण आज या शब्दांना या देशातलं नवपेशवाईचं सरकार कशा पद्धतीने घेईल आणि साहिरसारख्या कवी, गीतकारांचं काय करेल ?
कदाचित त्यांनाही या देशाच्या जमिनीवरील काही एकर जागा निवडून त्यावर बांधल्या गेलेल्या उत्तुंग महाकाय अभेद्य भिंतींआड, कडेकोट सुरक्षाव्यवस्थेतल्या चोवीस तास नेमेलेल्या पहाऱ्यात आणि बंदुका, लाठ्या, पट्टे उपलब्ध केल्या गेलेल्या जागेत आणून ठेवेल. या देशात जिथे संविधान, लोकशाही, मानव अधिकार, समता, मानवीयता अशा गोष्टींचा बोलबाला आहे; तिथे या भिंती उभारून खाकी गणवेशाचा म्हणजेच पोलिसी दंडेलशाहीचा दरारा असलेला दबावयुक्त माहोल नियोजनपूर्वक बनवलाय. आणि सुरू केलाय एक सरकारी व्यवस्थापुरस्कृत खेळ, मानव अधिकारांच्या पायमल्लीचा. मानवासोबतच्या अमानवीय वागणुकीचा. निर्दोष व्यक्तीच्या स्वाभिमानाला पावलोपावली चिरडण्याचा. किमान माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक गोष्टींपासूनही व्यक्तीला वंचित ठेवण्याचा. माणूस असूनही जनावरागत जगण्यास भाग पाडल्या जाण्याचा. आणि या अशा असंविधानिक, बेकायदेशीर, हुकूमशाहा व्यवस्थेबाबत या महाकाय भिंतींच्यापलीकडे काहीही जाऊ नये यासाठीच्या दडपणूकीचा खेळ.
मी हिटलरच्या फॅसिस्ट जर्मनीची ऐतिहासिक कथा सांगत नाहीये; तर मी ज्या जेलमध्ये गेल्या चार वर्षांपासून न्यायाधीन बंदी म्हणून राहतोय त्या तुरुंगाची अंतर्गतव्यवस्था एक्स्पोज करण्याचा प्रयत्न करतोय. तुरुंग प्रशासनाला त्यांचं खरं चित्र उघड करणारी कुठलीही कृती जराही खपत नाही. आपलं चित्र आणि चारित्र्य कसं झाकलेलं आणि या उत्तुंग पाषाणी भिंतीआड दडलेलं राहील याची काटेकोर खबरदारी तुरुंग घेतो. तुरुंग प्रशासनाबाबत ‘बरं’ बोलणार्याचं कौतुक केलं जातं आणि ‘खरं’ बोलणाऱ्याला वेगवेगळ्या शिक्षा देऊन दडपलं जातं. हे बिलकुल देशातल्या आजच्या नवपेशवाई व्यवस्थेसारखंच आहे; ज्या व्यवस्थेपुढे मान न झुकवण्याची सजा म्हणून आम्हाला इथे आणलं.
७ सप्टेंबर २०२० रोजी होऊ घातलेल्या अटकेच्या काही काळ आधी मी या ओळी लिहिल्या होत्या.
फॅसिस्ट सत्तेने मला दोन पर्याय दिलेत
आझादी किंवा तुरुंग..
मी तुरुंग निवडलाय
कारण,
भीक म्हणून पदरात पडलेल्या आझादीपेक्षा
माझं मन तुरुंगात समाधानानं जगू शकेल…
या ओळी मला कुठल्या निवांत, एकांत, रम्य, रोमांचक चिंतनातून स्फुरलेल्या नाहीत. या ओळी एका अटीतटीच्या संघर्षाचं द्योतक आहेत. या देशातल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या खोट्या षडयंत्राला आणि दबावाला कोलत असताना या ओळी सुचल्या.
“एल्गार परिषद आयोजनाच्या मागे माओवादी असल्याची कहाणी मान्य करा; आणि ते कसे आणि कोण कोण होते हे ‘आम्ही’ सांगतो, त्या स्टेटमेंटवर सही करा. बस्स ! आम्ही तुम्हाला अटक करणार नाही आणि जर हे केलं नाहीत तर मग तुम्ही एका मोठ्या काळासाठी तुरुंगात गेलाच म्हणून समजा. घाईत काही ठरवू नका. घरी जा. निवांत विचार करा. घरच्यांशी, तुमच्या जवळच्या लोकांशी चर्चा करा आणि वेळ घेऊन निर्णय घ्या. जा घरी. उद्या या.”
हे शब्द होते एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे. हे शब्द चढ्या आवाजातले नव्हते. आमची कॉलर धरून आरडाओरडा करणारे नव्हते. शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देणारे नव्हते. नेहमीचा पोलीस रीमांड असतो त्या पॅटर्न मधले नव्हते. अगदी शांत-सौम्य आवाजातले सोफेस्टिकेटेड शब्द होते. अगदी समजावून सांगितल्यागत, शांतपणे कोणीतरी तुमच्या हिताची, तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतंय अशा पॅटर्नमध्ये होते.
या शब्दांनी आम्हाला म्हणजे मला आणि सागरला कडेलोटाच्या धक्कादायक बिंदूवर नेऊन ठेवलं होतं. ही आमची पोलिसी चौकशीची पहिलीच वेळ नव्हती. आधीच्या तुरुंगवासात आम्हाला रिमांड तसेच न्यायालयीन प्रक्रिया चांगलीच माहित झालेली होती. त्यामुळे कुठल्या सेक्शनखाली आम्हाला ते काय द्यायला सांगतायत हे आम्हाला पक्क माहीत होतं आणि ते दिलं नाही तर काय ? हेही चांगलंच माहीत होतं.
कुणाशीही चर्चा, विचार-विनिमय करण्याची गरज पडली नाही. किंबहुना तशा चर्चेची स्पेस आम्ही ठेवलीच नाही. निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी खांद्याला सॅक लावून तुरुंगात जाण्याच्या तयारीने निघून आलो; काहीसं हसत, काहीसं रडत, मनात एक मोठं वादळ घेऊन. आमच्या कलापथकाच्या आणि चळवळीच्या इतर कार्यकर्त्यांचा निरोप घेतला. घरच्यांशी फोनवरुन खूप मोजकं बोललो.
या वादळाची तीव्रता मला आणि माझ्या जीवनसाथीला म्हणजे हर्षालीला चांगलीच माहित होती. पॉलिटिकल कमिटमेंट हि संकल्पना तिच्यात चांगलीच मुरलेली होती; तरीसुद्धा तिच्या डोळ्यातून धबधब्यागत वाहणाऱ्या आसवांना ती जराही रोखू शकली नव्हती. त्या अश्रूंनी ओलावलेला निरोप घेऊन आणि “तुझ्या या दमनाला सामोरे जाण्याच्या निर्णयाचा मला अभिमान आहे” हे तिचे शब्द घेऊन अटक होऊन आत गेलो.
माझा आणि सागरचा दहा दिवसांचा एनआयएचा रिमांड पुस्तक वाचत आणि एकमेकांसोबत चर्चा करत एका खिडकी नसलेल्या पोलादीगजाच्या खोलीत गेला. तिथे एक लाईट 24 तास जळत असायची. सतत दिवस असल्यागत वाटायचं. रात्र व्हायचीच नाही असा माहोल आणि दारासमोर पोलीस बंदोबस्त 24 तासांचा. भालचंद्र नेमाडेंची हिंदू कादंबरी, बालाजी सुतार, जयंत पवार, नीरजा यांचे कथासंग्रह वाचायला चांगला निवांत वेळ मिळाला.
काहीच विशेष चौकशी झाली नाही. त्यांना ‘जे हवं होतं’ आमच्याकडून ‘ते’ मिळत नव्हतं; त्यामुळे इतर काही चौकशी न करता मागच्या खोट्या केसचा आधार घेत ज्यात आम्हाला आधीच जामीन मिळाला होता; त्यांनी आम्हाला भीमा कोरेगाव एल्गार परिषदेत खटल्यात आरोपी म्हणून तुरुंगात पाठवलं. कोर्टात एडवोकेट निहालसिंग राठोड आणि एडवोकेट बरून कुमार यांनी चांगले आर्ग्युमेंट्स केले मात्र तरीही न्यायालयीन कस्टडी मिळालीच. आम्ही पुन्हा त्याच तळोजा मध्यवर्ती कारागृहात आलो जिथून 2017 मध्ये जामीनावर सुटून बाहेर पडलो होतो.
हो, हा माझा आणि सागरचा दुसरा तुरुंगवास आहे. ‘अर्बन नक्षल’ या भ्रामक, कथित, रचित आरोपाअंतर्गत युएपीए नावाच्या हिटलरी कायद्याच्या कलमांचा आधार घेत, आधीची चार वर्षं २०१३ ते २०१७ या महाराष्ट्राच्या नवी मुंबई मधील तळोजा मध्यवर्ती कारागृहात काढलेली आहेत आणि आता २०२० ते २०२४ जवळजवळ ४ वर्षं असा एक मोठा तुरुंगवास आम्ही आजही काढतो आहोत.
का ? कशासाठी ? या प्रश्नांची उत्तरं त्या तमाम ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या जीवनसंघर्षातून मिळतात ज्यांना आदर्श मानून आम्ही या समतालढ्यात स्वतःला झोकून द्यायचं ठरवलं. विषमतावादी व्यवस्थेविरोधात निरंतर आवाज उठवत होतो म्हणून २०१३ ला अटक केली होती. आवाज उठवण्याचं माध्यम काय होतं? गाणी, कविता, पथनाटय, शाहीरी. कला-संस्कृतीसारखी सृजनात्मक अभिव्यक्ती म्हणजे इथल्या ब्राह्मण्यवादी-भांडवली सत्ताधाऱ्यांना बंदूका आणि बॉम्ब वाटतात.
मग अशावेळी याच देशाच्या मातीतले गजानन मुक्तीबोधांसारखे क्रांतिकारी साहित्यिक आठवतात जे म्हणतात ‘अब अभिव्यक्ति के सारे ख़तरे उठाने ही होंगे, तोड़ने होंगे ही मठ और गढ़ सब !’ ‘सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठं हाय हो? सांगा धनाचा साठा न आमचा वाटा कुठं हाय हो?’; व्यवस्थेला हा असा परखड सवाल विचारणाऱ्या लोकशाहीर वामनदादा कर्डकांच्या शाहीरीतून त्यांचं जगणं स्वतःत भिनवता आलं नाही तर ते केवळ मनोरंजन असेल. आणि कला फक्त कलेसाठी नसते आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी असते आणि आयुष्यं सुंदर तेव्हाच बनू शकतं जेव्हा समाजात समता असेल आणि समता तेव्हाच असेल ज्यावेळी हि विषमतावादी व्यवस्था नसेल; आणि मग हि विषमतावादी व्यवस्था नसावी यासाठी संघर्ष अटळ आहे. जो अनादीकाळापासून सुरू आहे; आणि त्याचेच पाइक म्हणून आम्ही आतापर्यंत काम करत आलोय.
त्यामुळे २०१७ च्या सप्टेंबर महिन्यात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिवंगत आदरणीय पी. बी. सावंत सर आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील सरांनी महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी, आंबेडकरवादी, लोकशाही-संविधानवादी संघटनांना आजच्या नवपेशवाई व्यवस्थेविरोधात एकत्र येण्याची हाक दिली; त्यावेळी आम्ही कलापथक म्हणून त्यात सामील झालो.
मला आजही ऑक्टोबर २०१७ सालचं पुण्याच्या साने गुरुजी स्मारकातलं एल्गार परिषदेच्याआधीच्या नियोजन बैठकीतलं न्या. पी. बी. सावंत सरांचं अध्यक्षीय भाषण आठवतंय. ‘भीमा कोरेगाव हि आपली अस्मिता आहे; त्यामुळे तिला समोर ठेवून आपल्याला या मनूवादी व्यवस्थेविरोधात लढायचं आहे.’ त्यांच्या संयोजन आणि मार्गदर्शनाखाली एकत्र आलेल्या सगळ्या संघटनांनी, आणि एकूणच जनतेने एल्गार परिषदेला आकार दिला. नव-पेशवाई विरोधातल्या जनतेच्या सामूहिक लढ्याचा एल्गार परिषद आवाज बनली.
एल्गार परिषदेतली गाणी, कविता, शेर, पथनाट्य, भाषणं हे आर एस एस प्रणित भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात एक ठोस बंड होतं. ‘बंड’ होतं, ‘षडयंत्र’ नाही. षडयंत्र तेव्हा असतं, जेव्हा छुपेपणाने म्हणजे जाहीरपणे काही न बोलता नियोजन केलं जातं; जे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांनी केलं. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे दलित-बहुजनांवर हल्ले करून. एल्गार परिषदेचा प्रत्येक उद्देश आणि कृती-कार्यक्रम सुरुवातीपासून जाहीरपणे मांडला गेलाय. अगदी आर एस एस प्रणित भारतीय जनता पक्षाच्या सरकारला नव पेशवाईचं सरकार संबोधण्यापासून ते आर.एस.एस प्रणित भारतीय जनता पक्षाला कधीही मतदान न करण्याची शपथ घेण्यापर्यंत सगळं, हे लोकशाही आणि संविधानाला प्रमाण मानूनच केलेलं होतं. ज्यात काहीही वावगं नव्हतं. एल्गार परिषदेची घोषणाच होती; ‘संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, देश वाचवा !’ एल्गार परिषद शांततेतच पार पडली. मग खटला पडलाच कसा ?
एल्गार परिषद-भीमा कोरेगाव खटला : जगातलं सगळ्यात मोठं सरकारी षडयंत्र
असं मी, आम्ही आणि आपल्या देशातली जनता म्हणतच होती. पण ३ वर्षांपूर्वी हे म्हटलंय जगातल्या सर्वोत्तम फॉरेन्सिक अनॅलिसिस करणाऱ्या आर्सेनल कन्सलटन्सीने. भीमा कोरेगाव एल्गार परिषद खटला का बनवला गेलाय ? कशा पद्धतीने पोलिसांनी नियोजनबद्धपणे पुरावे पेरले ? एक मोठं षडयंत्र रचून देशातल्या विविध राज्यातल्या कार्यकर्त्यांना कसं अटक केलं ? त्याआधी भीमा कोरेगावला १ जानेवारी २०१८ चा हल्ला कसा घडवला गेला आणि त्याला दोन गटातील ‘दंगल’ कसं संबोधलं गेलं? संपूर्ण राज्यातील सामाजिक राजकीय वातावरण बिघडवण्याचा कसा प्रयत्न केला गेला ? त्या हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्या भिडे-एकबोटेला वाचवायला त्याचं बिल एल्गार परिषदेवर कसं फाडलं गेलं ?
गेल्या सहा वर्षात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बऱ्याच प्राध्यापक, लेखक, विचारवंत, कलाकार कार्यकर्त्यांच्या लिखाणातून या सर्व प्रश्नांची उत्तरं जनतेसमोर ठोस स्वरूपात उघड झाली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भाजप सरकारने सत्य लपवून आणि आपल्या सर्वच प्रचार यंत्रणा वापरून स्वतःचा प्रचार करण्याचा सतत प्रयत्न केलाय; तरीही जनतेसमोर या षडयंत्राचं खरं चित्र उघड करण्यापासून लोकांना रोखू शकलेले नाहीत. Bk 16 वर अर्बन नक्षलचा शिक्का मारून केलेल्या अटकेचा निषेध म्हणून देशातल्या व वेगवेगळ्या भागातील मान्यवरांनी ‘मी टू अर्बन नक्षल’ ही निषेध मोहीम राबवली होती. भाजप सत्ताधाऱ्यांनी खोटं पसरवून जनतेमध्ये खास करून आंबेडकरी जनतेमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेने ही धृवीकरणाची ही खेळी हाणून पाडली. या खटल्याबाबतचा लढा सर्व स्तरावर सुरू आहे. किंबहुना गेल्या सहा वर्षांपासून न्यायालयात खटला न्यायधीन आहे. Bk 16 मधील सात बंदी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. एक बंदी फादर स्टॅन स्वामी तुरुंगवासातच शहीद झालेत आणि उरलेले आठ जण आम्ही अजूनही तुरुंगात आहोत. जामीनावर किंवा खटला संपून निर्दोष म्हणून बाहेर पडण्याची शक्यता जराही दृष्टिक्षेपात नाही, स्वप्नातही येत नाहीये. सगळंच भयाणपणे अनिश्चित आहे. ही अनिश्चितता एखाद्या श्वसनाच्या रोगासारखी श्वासा-श्वासात भरून गेलीये. परंतु तुरुंगवासाच्या निमित्ताने जिंदगीत आलेला हा भूकंप नेमका काय आहे ? आणि याचे कारण काय ? हे स्पष्टपणे कळण्याइतकं मन नक्कीच सजग होऊन गेलंय इतक्या वर्षांच्या चळवळीच्या सानिध्यामुळे. हे राजकीय दमन आहे आणि ते कोणती व्यवस्था, का करत आहे ? याची कारणमीमांसा करायला चळवळीने शिकवलंय.
‘एल्गारवाले मचांडी’ (एल्गार आंदोलक)
आधीच्या ४ आणि आताच्या ४ अशा एकूण ८ वर्षांच्या तुरुंगावासातून आलेले अनुभव म्हणजे व्यवस्थात्मक हिंसाचाराचाच भाग आहे हे मी आज ठामपणे म्हणू शकतो. ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ अशी ध्येयं प्रधान तसेच मूलभूत म्हणून माथ्यावर मिरवणारा हा विभाग या स्वतःच्या मूलभूत ध्येयांबाबतीत मात्र कणभरही कार्यरत नाही; म्हणजे या स्वतःच्या ध्येयाबाबतची कसलीच जाणीव इथे कुणालाही नाहीये. त्यामुळे तुरुंग प्रशासन मानवीयतेच्या बाबतीत प्रचंड संवेदनाशून्य होऊन गेलेललं दिसून येतं. जबाबदार म्हणून इथे नियुक्त केलेला प्रत्येक जण स्वतःची मूलभूत कर्तव्यं-जबाबदाऱ्या सोडून भलत्याच गोष्टी करण्यात व्यग्र दिसून येतो. प्रचंड भ्रष्टाचारानं सडलेली व्यवस्था इथे पावलोपावली जाणवते आणि मग सुरू होतो आमचा या भ्रष्ट आणि अमानवीय व्यवस्थेसोबतचा संघर्ष. कधी तीव्र, कधी सौम्य, कधी उग्र आणि कधी क्रिएटिव्ह. ‘एल्गारवाले’ अशी इथं आमची बऱ्यापैकी ओळख होऊन गेलेली आहे. काही प्रमाणात दबाव आम्ही इथल्या व्यवस्थेवर निर्माण करू शकलोय आणि काही प्रमाणात इथली व्यवस्था आमच्यावर दबाव निर्माण करू शकलीय. तुरुंगासोबतचा संघर्ष इथे रोजचाच आहे. रोज नवे अडथळे, नवे नियम, नव्या समस्या ही व्यवस्था निर्माण करते आणि कुठच्या ना कुठच्या कोपऱ्यात जेल सोबतच्या या संघर्षाची गोष्ट ऐकू येते.
मग तो संघर्ष सुधीर, सागर, गौतम यांनी जेल अधीक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर चप्पल काढून उभे राहण्याच्या बेकायदेशीर सामंती प्रथेविरोधातला असो; किंवा कोर्टाने प्रोडक्शनचे निर्देश दिलेले असूनही मुद्दामून आकसापोटी पदाचा गैरवापर करून ज्यावेळी एका जेल अधीक्षकाने कोर्टात पाठवले नाही त्यावेळी त्या विरोधात वीसी कोर्टात झालेला संघर्ष असो, लाईफ सेविंग औषधं गेटात दोन-तीन महिने अडवून ठेवून, गायब करून टाकल्यानंतर त्या विरोधात जेल अधीक्षक आणि तुरुंग वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात सुरेंद्र गडलिंग यांनी कोर्टात दाखल केलेली तक्रार आणि ‘फादर स्टॅन स्वामी म्हणजे या खटल्यातील सह-आरोपी यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती संस्थात्मक हत्या आहे’ अशी तक्रार करणारा सुरेंद्र, सागर, रमेश यांचा तक्रार अर्ज हा याच संघर्षाचा भाग आहे. वर्णन गोनसाल्विस यांना डेंग्यूचा तीव्र आजार असतानाही बाहेरच्या दवाखान्यात पाठवत नसताना अंडा सेलमधील सुरेंद्र, सुधीर, सागर, रमेश यांनी केलेला संघर्ष असो; किंवा आमची पत्रं बाहेर पाठवताना बेकायदेशीरपणे अडवून ठेवणे तसेच एन.आय.ए आणि ए.एन.ओ यांना परस्पर पाठवणे या विरोधात जेल अधीक्षकाविरोधात सुधीर, अरुण, रमेश यांनी केलेल्या तक्रारी असोत या संघर्षांना कधीच पर्याय नव्हता.
बंदयांना आवश्यक पाणी मिळण्यासाठी, मुलाखतीला येणाऱ्या बंदयांच्या नातेवाईकांसाठी कसलीच व्यवस्था नसण्याविरोधात, फोन मुलाखतीची सुविधा सुरू करण्यासाठी, आवश्यक वैद्यकीय उपचार न मिळण्याविरोधातल्या तक्रारी आणि मागण्यांना घेऊन सागरला उपोषण करावं लागलं. मलेरिया प्रतिबंधक मच्छरदाणी बळजबरीने हिसकावून नेली; तेव्हा अधीक्षक आणि वैद्यकीय अधीक्षक अधिकाऱ्याविरोधात रमेशने कोर्टात दाखल केलेली तक्रार आणि सागरने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली मच्छरदाणी चोरीची तक्रार म्हणजे जेलच्या संकुचित आणि हुकूमशाही व्यवहाराविरोधात केलेले संघर्ष आहेत.
आठवड्यातून एकदा मिळणारं चिकन जेही स्वतःच्या पैशांनी विकत घ्यावं लागतं, ते चिकन ६०० ग्रॅम रस्सा आणि ४०० ग्राम चिकन असं देण्याच्या जेलच्या भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष करावाच लागतो. जेव्हा सत्य दडवून भ्रष्टाचार बोकाळतो तेव्हा माहितीच्या अधिकारातून ते उघडकीस आणावं लागतं. रोना, महेश, हॅनी यांनी कॅन्टीनच्या स्पेशल भाजीच्या वाढत्या दराविरोधात केलेला संघर्षसुद्धा महत्वाचा ठरलाय. सध्या जेल कॅन्टीनमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातला संघर्ष ऐरणीवर आहे. आम्हा एल्गार बंद्यांसाठी हे संघर्ष नवीन नाहीत हे तुरुंगात आल्यापसून सुरू आहेत आणि यापुढेही सुरू राहतील.
जेलमध्ये अशा गोष्टीला ‘मचांड’ म्हणतात. असे खूपसे मचांड आम्ही एल्गार बंदयांनी केलेले आहेत; म्हणून आम्हाला ‘मचांडी’ ठरवून अंडा सेलमध्येही ठेवलं गेलं होतं. आता अंडा सेल डिमॉलिश करणार आहेत, म्हणून आम्हाला अंडा सेलमधून पुन्हा जनरल सर्कलमध्ये पाठवलेलं आहे. वीस वर्षांपूर्वी सरकारी खर्चातून बांधला गेलेला हा अंडा सेल निव्वळ वीस वर्षात कोसळण्याच्या स्थितीत आलेला आहे. खराब बांधकाम, बांधकाम मटेरियलमध्ये भेसळ आणि सरकारी निधीत भ्रष्टाचार अशी खूपशी कारणं आहेत. आम्ही हा घोटाळा बाहेर काढण्याच्या नक्कीच प्रयत्नात आहोत. तुरुंगाबाहेर जनता एका नवपेशवाई फॅसिस्ट व्यवस्थेविरुद्ध निकरानं लढत आहे आणि त्या जनसंघर्षाच्या उर्जेवर इथं तुरुंगात आम्ही एल्गार बंदीही इथल्या व्यवस्थेविरोधात लढत लढत जगण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात ही तुरुंगाच्या आतली आमची लढाई तितकी निकराची जरी नसली, तरी आपला हक्क, न्याय, स्वाभिमान या मागण्यांसाठी तुरुंग प्रशासनाला झुकवण्याइतपत यशस्वी नक्कीच राहिलीये.
तुरुंगव्यवस्था : ‘सुधारगृहाच्या’ बिरुदा आडून व्यवस्थात्मक हिंसाचार
‘तुरुंग या व्यवस्थेने का बनवलाय ?’ हे तुरुंगात गेल्याशिवाय प्रकर्षानं जाणवत नाही. काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना, बुद्धीजीवींना तुरुंग म्हणजे विद्यापीठ वाटलंय; पण मला तुरुंग फक्त न फक्त छळछावणीच वाटलाय. वाचनाला, लिखाणाला निवांत वेळ इथे मिळत असला, तरी त्या वाचन, लिखाणासाठीची सकारात्मक स्पेस आणि मनस्थिती इथं कधीच उपलब्ध नसते. म्हणजे तुरुंगाचं चरित्र आणि स्ट्रक्चरच असं बनवलं गेलंय, की तुमच्यातल्या हर तऱ्हेच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होऊन जावं. हे खच्चीकरण प्रत्यक्षात होतं का नाही, हा एक संशोधनाचा विषय राहू शकेल. पण तुरुंग, तुमच्यातल्या कार्यकर्त्यावर हावी होत राहतो आणि नकारात्मक परिणाम करत राहतो; हे एक सत्य आहे. भय पेरतोच तुरुंग. परेशान करतोच तुरुंग. आत्मचिंतन, जगण्याची समीक्षा या नावाखाली काहीसं बॅक फुटवर आणून टाकतोच तुरुंग. गतकाळाच्या प्रगल्भ क्रांतिकारी वाटा आकसून घ्यायला किंवा वाटा वळवायला, वाटा बदलायला सांगतोच तुरुंग. तुरुंग तुम्हाला खूप जास्त आयसोलेट करून टाकतो, त्या प्रत्येक गोष्टीपासून जी तुमची जीवाभावाची असते; जी तुमच्या हक्काची असते; जी तुमच्या आवडीची आणि विचारांशी निगडित असते. आजादीचं हिसकावलं जाणं हे जगण्यातलं किती मोठं दुःख असतं याची तीव्र जाणीव तुरुंग देतो. कसलीच आजादी इथं तुम्हाला दिली जात नाही. जेल मॅन्युअल, मानवी अधिकार कायद्याचे निर्देशक, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे जजमेंटस् असं सगळं फाट्यावर मारून तुरुंग स्वतःच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही मेंदूला वाटेल ती मनमानी करत राहतोच. तुरुंगाची ही मनमानी अत्यंत त्रासदायक राहते. बंद्याला सतत परेशानीतच ठेवणे हे तुरुंग व्यवस्थेचे नित्यकर्म असल्यासारखं आहे. तुरुंगात प्रवेश केलेली प्रत्येक व्यक्ती ही गुन्हेगार आहेच असं मानून तुरुंगाच्या गेटात प्रवेश केल्यापासून त्याच्यासोबतचा अमानवीय व्यवहार सुरू होऊन जातो. आणि या अमानवीय व्यवहाराबाबत ‘ब्र’ उच्चारणाऱ्याला जबर शिक्षा, अपमान झेलावा लागतो. आम्हा सर्वांनाच या अमानवीय वागणूकीतून जावं लागलंय. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही इथल्या व्यवस्थेला आमच्यासोबत मानवीयतेनं आणि कायदेशीर वागायला आमच्या संघर्षातून बऱ्यापैकी भाग पाडलंय. एक चांगलं उपद्रव मूल्यं आम्ही या व्यवस्थेसमोर निर्माण करू शकलोय; त्यामुळे तुरुंग प्रशासनात खूप जास्त आकस, मात्र इतर बऱ्याच बंदयांच्या मनात एक चांगलं आदरयुक्त स्थान निर्माण करू शकलोय. हे यामुळे कारण ‘स्व आणि समाज’, ‘व्यक्तीवाद आणि सामूहिकता’ या संकल्पनांची बीजं समतावादी चळवळीने पेरलीत. त्यामुळे एल्गार बंदयांच्या या संघर्षाला सामूहिकतेचा, एकीचा, कटिबद्धतेचा आयाम आहे हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. कारण वस्तुस्थिती इथे यापेक्षा अधिक गडद, अधिक गंभीर, अधिक तीव्र आणि अधिक आव्हानात्मक आहे असे मी म्हणेन. उपचाराअभावी इथे लोकं सहज मरून जातात आणि इथल्या व्यवस्थेवर एक ओरखडाही उमटत नाही. तारखा न लागणे, योग्य न्यायालयीन मदत न मिळणे या अभावी इथं कैक जण दिवसेंदिवस सडत राहतात. मानवी जीवांच्या सडण्या-मरण्याची इथल्या व्यवस्थेला कसलीच फिकीर नसते. सर्व काही नियोजनबद्धपणे दाबलं जातं. दडपलं जातं. खालपासून-वरपर्यंत, आतून-बाहेरपर्यंत एक मोठं हितसंबंधांचं प्रशासकीय जाळं या तुरुंग व्यवस्थेला बॅकिंग द्यायला सदा तत्पर असतं. बरंच काही मॅनेज केलं जातं, बरंच काही सेटल केलं जातं. अभेद्य भिंतींचा आडोसा अन्यायाचे, बेकायदेशीरपाणाचे पुरावे दडपून टाकायला, झाकून टाकायला फायदयाचा होऊन जातो. इथल्या अन्यायाविरोधात कसलाही संघटित प्रतिरोध ही व्यवस्था उभी राहूच देत नाही. त्याबाबतीत तुरुंग अतिजागरूक असतो. 24 तासांचा पहारा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जाळं, खबऱ्यांचं अन-ऑफिशियल नेटवर्क खूप सॉलिडपणे वापरलं जातं. प्रतिरोधाची कुठलीही शक्यता रोखली जाते. विरोधात उठणाऱ्या प्रतिरोधी आवाजाबाबत तुरुंग एकदम खूंखार होऊन जातो. मनाला वाटेल त्या प्रकारच्या शिक्षा याबाबतीत केल्या जातात. नालबंदी, पट्ट्याने मारहाण, एका खोलीत अनिश्चित काळासाठी एकांतवासात कोंडून ठेवणे, मुलाखती, पत्रव्यवहार, कोर्टाच्या तारखा बंद करून टाकणे, मानसिक टॉर्चर करणे, सर्कलबंदी करणे, सर्कलबदली करणे, पुस्तकं जप्त करणे असं बरंच काही तुंरुंग शिक्षा म्हणून करत राहतो. इथे तुरुंगाचा इगो दुखावणे हा सुद्धा एक मोठा गुन्हा राहतो. तुरुंग प्रशासनाचा इगो हा पोलिसी प्रवृत्तीचा इगो असतो. खाकी गणवेशाचा इगो. पोलीस म्हणून असलेल्या अधिकारपदाचा इगो. हा इगो घेऊन तुरुंग त्यासमोरील प्रत्येक बंदयाला स्वतःला वाटेल त्या पद्धतीने नमवून, नतमस्तक करून जगायला भाग पाडत राहतो. इथला अधिकारी जे जसं म्हणेल, जी ऑर्डर देईल ती मान्य करावीच लागते. हा पोलीसी खाक्या असतो. त्याबाबत कसलंही स्पष्टीकरण विचारायचं नाही; का? कशाला? असे प्रश्न विचारायचे नाहीत. आणि ‘मी नाही मानणार या ऑर्डरला’ असं बिलकुल म्हणायचं नाही. अशी कुठलीही कृती तुरुंग प्रशासनाचा इगो दुखावणारी राहते. आणि हा इगो दुखावला की मग तुरुंग तुमच्याबाबतीत आणखी अमानवीय होऊन जातो. तुम्ही तुरुंगाच्या टारगेटवर येता आणि तुरुंग स्वतःची ताकद वापरून तुम्हाला दडपण्याची फील्डिंग लावू लागतो. तुम्हाला प्रत्येक पावलावर त्रास, मनस्ताप देण्यासाठी तत्पर होऊ लागतो. उदा.,कोर्टातून पुन्हा तुरुंगात येताना तुरुंगाच्या लाल गेटात (मुख्य प्रवेशद्वार) झडतीसाठी म्हणून तुमचे कपडे उतरवून तुम्हाला अंडरवेअरवर उभे राहावेच लागते आणि समोरचा शिपाई तुमची अंडरवेअर खेचून आत काय आहे का? ते तपासू लागतो, तुमच्या गुप्तांगाला हात लावून चाचपतो. कधी कधी तुमच्या संडासच्या जागेत (anal) बोट घालून चाचपतो. हे सर्व सहन करावंच लागतं. गेटातले सीसीटीव्ही कॅमेरे, गेटात उपस्थित असणाऱ्या महिला कर्मचारी, गेटात असणारा भडक प्रकाश म्हणजेच सर्व काही खुल्ल असणं आणि त्यात तुम्हाला नागडं करणं हे कुठल्याही कायद्यात नियमावलीमध्ये जरी नसलं; तरी तुम्हाला फॉलो करावंच लागतं. कारण नाही केलं तर तुरुंग प्रशासनाचा इगो दुखावला जातो. व्यक्तीच्या स्वाभिमान, आत्मसन्मानावरचा हा हल्ला तुरुंग अगदी सहजतेने करतो आणि हा बेकायदेशीर व्यवहार सहज पचवतो. हे कपडे उतरवून ‘कशी जिरवली’ ही भावना तुरुंगाच्या इगोला सुखावणारी असते. तुरुंगात आल्यानंतर चेकिंग हॉलमध्ये अधीक्षकासमोर अर्धनग्न अवस्थेत वाट पाहत बसून ठेवणं, वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर किंवा त्याच्या ऑफिसच्याबाहेर चपला काढून राहणं, बॅरेक झडतीसत्रात तुमच्या सामानाची कशीही उलथापालथ, अस्ताव्यस्त टाकलेललं-फेकलेललं साहित्य सहन करणं, रोज मिळणारा चहा-नाश्ता याच्या ढासळून गेलेल्या दर्जाबाबत काहीही न बोलणं, अर्ध्या कच्च्या चपात्या, बेचव भाजी-डाळ याबाबत कसलीही तक्रार न करता खाणं, दुधामध्ये असलेल्या भेसळीबाबत काहीही न बोलणं, ना नफा ना तोटा या तत्त्वावर असणाऱ्या तुरुंगातील उपहारगृहात चाललेल्या भ्रष्ट व्यवहाराला सहन करणं. एकंदरीत तुरुंगाच्या सर्वच भ्रष्ट आणि बेकायदेशीर कृत्यांना, वागणूकीला सहन करणं म्हणजेच तुरुंगाचा इगो गोंजारणं. तुरुंगाचा इगो दुखावणं म्हणजे गंभीर अपराध. आम्ही हा गंभीर अपराध बऱ्याच वेळा केलाय आणि तुरुंगानं आम्हाला टार्गेटवर ठेवून मनस्ताप देण्यासाठी वेळोवेळी सूडबुद्धीतून उचापत केलेली आहे.
तुरुंगवास तुमच्या आयुष्यात अजून एका वेदनादायी भयानकतेला घेऊन येतो आणि ते म्हणजे विरह. या तुरुंगवासात तुरुंगातील व्यक्ती आपल्या जीवनसाथी, पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचा जो त्रास सहन करत करत जगते त्या विरहाचं अस्तित्व तुरुंगात प्रत्येक पावलापावलावर काट्यासारखं सलणारं राहतं. फक्त न फक्त वीस मिनिटांची काऊनडाऊनसारखी मुलाखत. नेमकं काय बोलायचं? आणि काय ऐकायचंय? किती बघून घ्यायचं? किती नजरेत साठवून घ्यायचं? याची प्रचंड धांदल उडून जाते. मग कोर्टाचे मुद्दे, इतर आवश्यक गोष्टी आणि कुणाकुणाचे निरोप यांची आडवी-तिडवी जुळवाजुळव करत मुलाखतीची वीस मिनिटं संपून जातात. मुलाखतीला असणारे तुरुंग कर्मचारी-अधिकारी खटकन तुमचा फोन बंद करून टाकतात आणि तुमच्या हृदयात उसळून आलेला संवाद क्षणार्धात खटकन कट होऊन जातो आणि तुम्ही हतबलपणे निःशब्द होऊन पाहत राहता समोरच्या काचेतून तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्याला. दोघांमध्ये एका खिडकीची काच फक्त असते. मात्र प्रत्यक्षात असणारं इवलंस अंतर पार करून आपल्या जीवलगाला मिठी मारणंही अशक्यप्राय गोष्ट होऊन गेलेलं असतं. डोळ्यांनी, हाताने निशब्दपणे निरोप देऊन व्यक्ती निघतो आणि त्याला आठवतं की या सगळ्या धांदलीत ‘कशी आहेस?’ हेच बोलायचं राहून गेलं. कासावीसता अंतःकरणाला व्यापून टाकते. मन मनाला खाऊ लागतं. स्वतःचा स्वतःला प्रचंड राग येऊ लागतो. डोळ्यातून हलकीशी आसवं ओघळून जातात. विरह हजारो काटे टोचल्यासारखा अघोरी होऊन जातो. प्रत्येकाचीच हीच परिस्थिती असते. खटल्यातील आरोपी म्हणजे न्यायधीन बंदी जो निर्दोष असूनही त्याला हा त्रास सहन करावा लागतो आणि खटल्यात आरोपी नसतानाही, काहीच गुन्हा नसतानाही या विरहाचा जाच आरोपीच्या जीवनसाथीलाही सहन करावा लागतो. या संवेदनशील मुद्द्याबाबत आणि अन्यायाबाबत तुरुंग, न्यायालय, कुठलीच यंत्रणा मानवीय विचार करत नाही. पत्रंही इथले अधिकारी ओळ न ओळ वाचून देतात, त्यामुळे लिखाणावरही पहारा असतो. बंदयांच्या मनातील घुसमट, अस्वस्थता अशी उघड स्वरूपात दिसत नाही; पण या अस्वस्थतेचं प्रमाण महाकाय आहे. हि अस्वस्थता एखाद्या दुर्धर रोगासारखी अंतःकरणात आपलं विखारी अस्तित्व वाढवत जाते. वरवर हसणारा व्यक्ती आतून परेशान, दुःखी होऊन अधांतरी भटकत असतो. मनाचा स्वस्थपणा लाभेल अशी जमीन, अशी सावली त्याला मिळतच नाही. रात्र भयाण तळमळणारी राहते आणि दिवस रिकामे रिकामे गुलजारच्या गाण्यागत; “दिन खाली खाली बर्तन हैं, रात है जैसा अंधा कुआं…”
वो सुबह कभी तो आएगी….
तर एकंदरीत, हे सगळं असं असलं तरी या दमनाला घेऊन गैरसमज आणि अस्पष्टता असण्याचं काहीच कारण नाहीये. कोण शत्रू? आणि कोण मित्र? हे या काळाने लख्खपणे समोर आणलंय. आधी ते नव्हतं असं नाही; पण या काळानं खास करून तुरुंगानं चिंतनाला चांगली स्पेस दिली आणि त्या चिंतनाने स्वतःची राजकीय आणि भावनिक समीक्षा करण्याची संधी दिली. माझ्या शब्दातून सगळंच तीव्र नकारात्मक वाटू शकेल. परिस्थिती तशी नकारात्मकतेनेच भरलेली आहे पण तरी या नकारात्मक अंधार युगात मनातली सकारात्मकतेची आणि आशावादाची मशाल पेटलेलीच आहे. या मशालीची आग पेटत राहण्यासाठीची ऊर्जा चळवळीनेच दिली आहे. या घुसमटलेल्या, बंदिस्त, अमानवीय वातावरणात एक कलाकार कार्यकर्ता म्हणून स्वतःला क्रिएटिवपणे टिकवून ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न मी करू शकलोय. तुरुंगाबाहेरचा चळवळीचा गोतावळा आणि तुरुंगातल्या एल्गार बंद्यांचा गोतावळा यांची खूप मोलाची साथ यात लाभली आहे. या तुरुंगावर गाणी लिहिता आली, या दमनपर्वावर कविता लिहिता आल्या, काही लिखाण करता आलं, बरंच काही वाचता आलं, चळवळीतल्या अनुभवी ज्येष्ठ व्यक्तींसोबत निवांत चर्चा करता आली. त्या चर्चेतून बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या, संकल्पना आणखी स्पष्ट होऊन गेल्या, अनुत्तरीत प्रश्नांना उत्तरं मिळाली. एकूणच समतावादी चळवळीचा भूतकाळ जवळून आणि काहीसा खोल स्वरूपात उलगडून कळला. मनातल्या प्रत्येक भावनेशी खूप शांत आणि निवांतपणे हितगुज करता आलंय. प्रेम, नातं, सहजीवनाच्या संकल्पनेला आणखी खोलात शिरून समजून घेता आलं. म्हटलं तर बरंच काही नाही करता आलं आणि म्हटलं तर या बंदिस्तकरणातही काहीसं करता आलंय. तुरुंग तुमच्या बऱ्याचशा गोष्टींना जायबंदी करून टाकतो. तुमच्या प्रत्येक अभिव्यक्तीवर तुरुंगाची कडी से कडी नजर असते; पण तरी आमची अभिव्यक्ती या घेऱ्याला भेदून बाहेर जनतेत जाऊ शकलीय. हि काहीसा दिलासा देणारी बाब राहिलीये. या महाकाय पाषाणी भिंतीपलीकडेही आमचे शब्द, आमचं काव्य, आमचे संघर्षशील हुंकार जनतेपर्यंत जाऊ शकलेत आणि जनतेनं आमच्या अभिव्यक्तीला कवेत घेतलंय ही प्रेरणा देणारी गोष्ट राहिलीये. जनतेने आम्हाला स्वतःपासून कट होऊ दिलं नाहीये, आमचा जनतेसोबत असलेला अनुबंध आजही मजबूतीनं टिकून आहे ही एक आधार देणारी बाब आहे. या दमनाने व्यापक जनआंदोलनांपासून आयसोलेट करून तुरुंगात खितपत टाकलेलं असलं तरी या दमनाला मी व्यक्तिगत पातळीवर बिलकूल बघत नाही. आज देशात फॅसिस्ट सत्तेने चालवलेल्या व्यापक दमनाचा भाग म्हणून या दमनाकडे पाहतोय. नवपेशवाई व्यवस्थेविरोधात २०१४ नंतर देशाच्या कानाकोपऱ्यात दिल्ली, मुंबई तसेच इतर मोक्याच्या विभागात हजारो जनआंदोलनं होत आलेली आहेत. विस्थापनविरोधात, जनविरोधी कायद्यांविरोधात, जातीव्यवस्थेने केलेल्या अत्याचारांविरोधात, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील दडपशाहीविरोधात, बेकायदेशीर एन्काऊंटर्स-टॉर्चर विरोधात, शिक्षणाच्या बाजारीकरण-ब्राह्मणीकरणाच्या विरोधात, मनूवादी सत्तेच्या संविधानविरोधी सांस्कृतिक राजकारणाविरोधात, केंद्रीय तपास यंत्रणांच्या सरकार पुरस्कृत षडयंत्रांविरोधात अशा शेकडो अन्यायांविरोधात, दमनाविरोधात देशभरात जनतेने एल्गार पुकारलेला आहे. त्या प्रत्येक एल्गारावर सत्तेने दमन लादलेलं आहे. आम्हा एल्गार बंद्यांवरील दमन त्या व्यापक दमनाचाच भाग आहे असे स्पष्टपणे वाटतं.
पण मी निराश नाहीये कारण माझ्या आकलनात माझ्या समजदारीत मागच्या कैक हजारो वर्षांचा क्रांतिकारी संघर्षाच्या इतिहासाचा प्रगल्भ आशय भरून आहे. जो मला सतत पुन्हा पुन्हा सांगत राहतो दमनाविरोधात दृढपणे लढल्या गेलेल्या जनसंघर्षाच्या क्रांतिकारी कथा आणि त्या क्रांतिकारी कथेमधील जननायक-नायिकांची आदर्श चरित्रं. हा ऐतिहासिक लढाऊ आशय माझ्यातल्या एका आंदोलक संघर्षशील कलाकार कार्यकर्त्याला मरू देत नाही; मला या घुसमटलेल्या, घेरून असलेल्या तुरुंग माहोलात तग धरून राहायला मदत करतो. आणि ही अशी मनस्थिती आम्हा सर्वच एल्गारबंद्यांची (Bk-16) ची आहे याचा मला अभिमान आहे. तुरुंगाच्या अंडासेलमध्ये असताना कधीतरी अचानक रात्री सात-आठच्या दरम्यान लाईटी जायच्या आणि आधीच शांत, अनिश्चित असलेलं वातावरण भयाण शांत होऊन जायचं. अशा शांत वातावरणात व्यक्ती प्रचंड एकटा होऊन जायचा. त्या घनगर्द अंधारात दिसायचे ते फक्त तुरुंगाचे पोलादीगज. अंडासेलमधली अशी रात्र खूपच भयाण असते. अशा रात्रीत सहसा काहीच होऊ शकत नसतं. एका क्षणीक काळाचा युटोपीया अस्तित्वावर हावी होऊ पाहत असतो. किलबिल्या डोळ्यांनी व्यक्ती त्या अंधारात हतबल घुसमटणाऱ्या विचारांनी चाचपडू लागतो. तुरुंग अशावेळी एकदम खूंखारपणे हावी होऊ लागतो. एकांतपणाचा तो जबरी माहोल मला स्वतःच्या अंतःकरणात ब्लॅंक होऊन, मान खूपसून बसायला भाग पाडायचा. मी माझ्याच कोषात जाऊ लागायचो आणि तेवढ्यात बाजूच्या यार्डातून सुधीर यांचा उच्च पट्टीतला सूर त्या भयाण अंधःकाराला भेदत माझ्यापर्यंत शब्दांची प्रकाश-शलाका घेऊन यायचा. गाणं असायचं साहीरचं; “सर झूकाने से कुछ नही होता, सर उठाओ तो कोई बात बने”.. संपूर्ण अंडा सेल ते गाणं ऐकून प्रफुल्लित होऊन जायचा. मग सागरचं “ऐसे दस्तुर को, सुबह बेनुर को, मै नही जानता, मै नही मानता” सुरु व्हायचं. त्यानंतर गडलिंग सरांचं “नदिया नाव में डूब जाये रे” हा कबीराचा दोहा ऐकू यायचा.. त्याच आशेला एका उंचीवर नेत गौतम “वो सुबह कभी तो आएगी” गायचे. मग मीही गाणं म्हणायचो, “मेरा रंग दे बसंती चोला”.. गाण्याला गाणं जूडून जायचं आणि व्यक्तीला व्यक्तीही जूडत जायचे. एकांतपणाची भावना दूर भिरकावली जायची; कारण गाणी सामूहिकतेचा प्रगल्भ सुगंध दरवळून जायची. पहिल्यांदाच गाणं ऐकलेल्या अंडासेलमधल्यांना ते गाणं नवं काहीतरी देऊन जायचं आणि आधी गाणं ऐकलेल्यांना जुनं काहीतरी नव्याने सापडायचं. अंडासेल मधील ती रिकामी रिकामी अंधारी रात्र या अर्थपूर्ण गाण्यांनी आशयघन होऊन जायची. आणि या अशा रात्रीत काही ओळी मनात उमलून यायच्या…
मशाली विझल्या नाहीत अजूनही
दमनामागून दमन जरी
धग उराउरात अजूनही
तुरुंग पुन्हा पुन्हा जरी….