![Famagusta still](https://www.thepolisproject.com/wp-content/uploads/2025/02/Famagusta-2-300x200.webp)
BK-१६ जेल डायरी: तळोजा कारागृहाची अमानुषता आणि त्याविरोधातील त्यांच्या अस्तित्वाचा लढा याबद्दल मांडतायत सागर गोरखे
![](https://www.thepolisproject.com/wp-content/uploads/2025/02/Sagar-2-Polis-Project-1-640x1024.jpg)
To mark six years of the arbitrary arrests and imprisonment of political dissidents in the Bhima Koregaon case, The Polis Project is publishing a series of writings by the BK-16, and their families, friends and partners. (Read the introduction to the series here.) By describing various aspects of the past six years, the series offers a glimpse into the BK-16’s lives inside prison, as well as the struggles of their loved ones outside. Each piece in the series is complemented by Arun Ferreira’s striking and evocative artwork. (This piece has been translated into English by Vernon Gonsalves, read it here.)
पत्ता : तळोजा मध्यवर्ती कारागृह, नवी मुंबई, सर्कल नंबर २, बॅरेक नंबर ४. संध्याकाळचे ७ वाजलेत. बराखीच्या कोपऱ्यात पडलेला तो आंबूस वास मारणारा ओला गचाळ कचरा, खूप त्रास देतोय मला. त्यावर खरकट्या उष्ट्या, बिडीच्या थोटक्यांचा, तंबाखू खाऊन खाकरून थुंकलेल्या हिरव्या बेडकांचा थर दिसतोय. ओकारी येते पाहिलं की, माशा घोंगावत त्या बेडकांवर बसतात व नंतर मुद्दाम केल्यागत माझ्याच दिशेने येतात. ए, हट… हट.. शु… हट, कितीही हकला ओरडा त्या ऐकतच नाहीत. काय करू काहीच कळत नाही. बराखीच्या चारही संडासाची दार तुटलीत. पोत्यांचा आडोसा केलाय आम्ही, पण आता नवीनच अडचण झालीये, संडासंच तुंबलय पावसात. त्यात ती तुंबलेली नकोशी घाण दिसतीये आणि ते मिशाळ झुरळही. संडासाचा दरवाजा लवकर बसवून देण्यासाठी विनंती अर्ज केला होता मी महिनाभरापूर्वी अधीक्षकांना, पण सध्या बंदी कल्याण निधी उपलब्ध नाहीत म्हणाले होते ते, खराब सीसीटीव्ही कॅमेरा मात्र काल अर्जंट दुरुस्त केलाय प्रशासनाने. मागील कित्येक दिवसांपासून इथं एक-दोन बादल्या पाणी मिळते वापरायला. कैद्यांना त्यात आंघोळ करावी की कपडे धुवावे हे कोडेच असते. यावर कुणी आवाज उठवलाच तर शिव्या आणि मार खावा लागतो. घरचा कुत्राही खाणार नाही अशा सुमार दर्जाच्या चपात्या, बेचव भाजी, पांचट डाळ मिळते इथे कैद्यांना खायला. डाळीत तरंगणारी जळकी वस्तू लसूण आहे की एखादा किडा यावर पैज लागते कैद्यांची, काहीही निघो ते पोटात ढकलण्याशिवाय पर्याय नसतो तुमच्याकडे. इथे जेवण करणं म्हणजे मोठा संघर्ष वाटतो मला. जेवणाचा दर्जा घसरलेलाच राहावा याकडे अधिकारी मुद्दाम लक्ष पुरवतात, कारण त्यातून अमीर कैद्यांना ब्लॅक ने चांगले जेवण विकत देता येते. कैद्यांसाठी आतमध्ये कॅन्टीन नावाचं चार भिंतींचं दुकान आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कैद्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे हे उद्दिष्ट आहे त्याचे, पण जेल अधिकारी चढ्या भावाने कैद्यांना वस्तूंची विक्री करतात व लाखोंमध्ये कमाई करतात. इथं कमाईची अनेको माध्यमे जेल अधिकाऱ्यांनी तयार केली आहेत. कैद्यांना झोपण्यासाठी लागणाऱ्या अंथरुणाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे व अंथरूण पाच ते दहा हजारात विकणे. झोपण्यासाठीची जागा दहा ते पंधरा हजारात अरेंज करून देणे. तुरुंगातून बाहेर कोर्ट तारखेवर जायचे तर दहा हजार द्या, बाह्य रुग्णालयात जायचे तर पंधरा हजार द्या, हव्या त्या व्यक्तींना मुलाखतीत भेटावयाचे तर वीस हजार द्या, महिनाभर स्वादिष्ट जेवण खायचे तर लाख रुपये महिना मोजा, अशा पद्धतीने तुरुंगात धंदा सुरू असतो. यात अमीर कैद्यांची मजा होते तर सामान्य कैद्यांचे प्रचंड हाल होतात, कारण यात गरीब कैद्यांच्या वाट्याचं राशन चोरून त्यातून अमीर कैद्यांचे लाड पुरवले जातात.
मी तुरुंगात आल्यापासून मानसोपचार तज्ञाकडून औषध घेत आहे. म्हणजे नेमकं कोणता मानसिक विकार झालेला आहे याचं काहीच ठोस निदान झालेलं नाही. मात्र इथं मागच्या बऱ्याच मोठ्या काळापूर्वी येऊन गेलेल्या अनियमित मानसोपचार तज्ञांनी अगदी पाच ते दहा मिनिटांत माझी तपासणी करून मला काही औषधं दिलीत. इथं मानसिक विकारांवर महत्त्वाचा उपचार म्हणून जी काऊंसिलिंग असते ती कधीच केली जात नाही. फक्त औषधं दिली जातात. जी नेहेमीच अनियमित असतात. असो पण मला रात्रीची झोप लागत नाही. घड्याळाचा काटा जाग्यावर थांबल्याचा भास होत असतो. झोप लागलीच तर मी अचानक दचकून जागा होतो, डोक्यात घन पडल्यासारखं डोकं दुखत राहतं. मी बाहेर सांस्कृतिक कार्यकर्ता, विद्रोही गायक म्हणून ओळखला जातो, पण मी सध्या गात नाही.आई म्हणते गाणं गात रहा, पण मला इथं खूपच गुदमरल्यासारखं होतंय. आई पत्रात म्हणते, ‘तू सत्यासाठी लढणारा माझा स्ट्रॉंग मुलगा आहेत आणि मला तुझा अभिमान आहे’ पण मी तिला अजून सांगितलं नाही की मी इथं खूप परेशान आहे व सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय. तिला टेन्शन येईल खूप. डॉक्टर म्हणतात मेडिटेशन करा पण इथं थोडीही शांतता नाही. १८ ची क्षमता असलेल्या बॅरेक मध्ये ४८ कैदी कोंबलेत, कसली शांतता राहणार? सध्या पावसाळा सुरू आहे खूप चिकचिक असते बॅरेक मध्ये. इथं लोकांना डोळे आलेत, पिवळट चिकट द्रव बाहेर पडतो त्यातून, अनेक जण मलेरियाच्या तापाने फणफणलेत, इथे पांघरायला एकच मळकट पांढरी चादर मिळते. हिवतापाने गारद झालेल्यांनी त्या मळकट पांढऱ्या चादरी पांघरलेल्या असतात. एकमेकांच्या अंगाच्या उबेणे ते जेव्हा एका रांगेत पडून राहतात तेव्हा मढी रांगेत पडल्यागत वाटतं इथे. अनेकांच्या भकास नजरा करकरत गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे लागलेल्या असतात. फास घ्यायचा प्लॅन करत असतील ते कदाचित. मलाही वाटतं कधी कधी तसं, एकदाचं सगळं एका झटक्यात खल्लास करून टाकावं, पण आईचा अन तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो, मग सावराव लागतं स्वतःला. सावरत-सावरत तुरुंगात ४ वर्षांचा मोठा काळ निघून गेलाय. माझ्यावर असलेली भिमा-कोरेगाव-एल्गार परिषदेची केस याबद्दल जनतेला बरंच काही स्पष्ट होऊन गेलंय. पुस्तकं, लेख, निषेध आंदोलनं या माध्यमातून खूप काही समोर आणलंय जनतेनं. संविधानाने दिलेल्या असहमतीच्या अभिव्यक्तीच्या अधिकाराअंतर्गत कायदेशीर प्रक्रियेनं आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेला एक मोठं षडयंत्र म्हणून रंगवलं गेलं. सत्ताधारी आणि पोलिस यांच्या संगनमताने हा खोटा खटला उभारला आहे. म्हणजे एक मोठी कढई आहे. त्याखाली आग आहे. कढईत उकळतं तेल आहे. आणि त्यात एकेकाला उचलून टाकलं जात आहे. असा या केसचा फॉरमॅट आहे. जेलमध्ये वर्षानुवर्षे सडवणे आणि जनआंदोलनांची ताकद कमी करणे या कपटी हेतूने कसंही काहीही रचून देशाच्या विविध राज्यातील १६ जणांना तुरुंगात टाकलं गेलं. जनतेनं आम्हा बंद्यांना bk-१६ (bhima koregaon १६ ) असं बिरुद दिलेलं आहे. कुणी ६ वर्षांपासून कुणी ५ तर कुणी ४ वर्षांपासून तुरुंगात खितपत आहे.
सध्या कारागृहात जेवणाच्या घसरलेला दर्जा सुधारावा व कॅन्टीन विक्रीतला भ्रष्टाचार थांबवावा यासाठी संघर्ष सुरू आहे आमचा. याबद्दल अर्ज फाटे केलेत तर सीनियर जेलरने ऑफिसमध्ये बोलून धमकीच दिली आहे. खरंतर एल्गार खटला हा हाय प्रोफाईल असल्याने तुरुंगाच्या हिटलरी अधिकाऱ्यांना आम्हाला थेट मारहाण करता येत नाही अन्यथा दुसरा कोणी असता तर आत्तापर्यंत ‘नालबंदी’ ठोकून कुठल्यातरी कोपऱ्यात फेकून दिला असता जेलरने. मारता येत नाही म्हणून वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत आमच्या विरोधात. आमच्या विरोधात काही कैदी बांधवांना खोट्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात गैरसमज निर्माण करून आमच्याबद्दल नकारात्मक वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यात त्यांना यश लाभलेलं नाही कारण आम्ही एल्गार बंदी आमच्या सत्य, स्पष्ट आणि अन्यायाविरोधातील संघर्षरत जगण्यातून बंदी बांधवाच्या मनात एक चांगली जागा निर्माण करू शकलोय. एक गोष्ट इथं ठळकपणे नमूद करावीशी वाटते की, इथं प्रत्येक बंदयाचाच आवाज खुंखारपणे दाबला जातो. तक्रारीचा कुठलाही सूर तिथल्या तिथंच घोटला जातो. तक्रारीचा कुठलाही अर्ज फाडून फेकून दिला जातो. लय शहाणा झाला का ? हिशेबात राहा ! लय अर्ज करू नकोस तुला महागात जाईल ! याला सर्कल आऊट करून टाका ! याला दुसऱ्या जेलमध्ये पार्टी पाठवून टाका ! याची मुलाखत, याची मनीऑर्डर, याची कोर्टाची तारीख सगळं बंद करून टाका ! बेशिस्त वर्तणूक असं कोर्टाला लिखाण पाठवून टाका ! अशा खूप साऱ्या धमक्यांनी तक्रार करणाऱ्याचा मुद्दा दडपला जातो. इथं बंदयांची कुठलीही तक्रार कधीच गांभीर्यानं घेतली जात नाही. उलट तक्रारदाराला गांभीर्यानं टार्गेट मात्र केलं जातं. तुरुंग रोमच्या गुलामी व्यवस्थेसारखा वागतो. दलितांना बहिष्कृत करणाऱ्या माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या जातीप्रथे सारखा विकृत वागतो, तुरुंगाचा व्यवहार हा भांडवली व्यवस्थेसारखा भेदभाव पूर्ण व नफा केंद्रित असतो, तुरुंगात मान वर न करता गुलामासारखं गुलामी मानसिकतेतच कैद्यांनी जगत रहावं यासाठी कायद्यांना खेकसून ओरडून शिव्या देऊनच दहशत निर्माण केली जाते. तुरुंगाच्या लाल गेटात प्रवेश केल्या केल्या पहिल्या एन्ट्रीलाच कैद्यांना संपूर्ण नागवं केलं जातं. मेटल डिटेक्टर स्कॅनिंग मशीन वगैरे आधुनिक यंत्रे असताना देखील अमानवी विकृत पद्धतीने नागवे करत जेल कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून अंग झडती घेतली जाते. तुरुंगातील अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची मानसिकताच सरंजामी आहे, ती जाणीवपूर्वक तशी बनविण्यात येते कारण जेल सरंजामी राजासारखे चालवले जाते. कैद्यांनी अधिकाऱ्यांसमोर कारागृह अधीक्षकांसमोर चप्पल घालून उभे राहणे इथं खपवून घेतले जात नाही. स्वतः कार्यालयात शूज घालून बसलेल्या अधिकाऱ्यासमोर कार्यालयात शिरताना चप्पल काढावी लागते. अधीक्षकांसमोर मान तुकवून हळू आवाजात बोलायचे असे अनेक विकृत अलिखित नियम आहेत इथे. एकदा एका अधिकाऱ्यांचीच तक्रार करण्यासाठी मी जेल अधीक्षकांसमोर गेलो तेव्हा मला भर पावसात चिखलात चप्पल काढून अधीक्षकांसमोर उभं राहण्याची बळजबरी करण्यात आली, ज्याला मी व सुधीर ढवळे यांनी जोरदार विरोध केला, ‘हे सरकारी कार्यालय आहे पाटलाचा वाडा नाही’, तुमच्यासमोर चप्पल काढून का उभं राहायचं आम्ही, ही तर एक प्रकारची जातीव्यवस्था पाळता तुम्ही. माझ्या या प्रतिवादाचा, विरोधाचा परिणाम त्याच दिवशी आम्हाला भोगाव लागला. आम्हा ‘एलगारवाल्यांना’ उचलून ‘अंडा सेल’ च्या कोठड्यांमध्ये फेकण्यात आले, जिथे आम्ही झाडाचं साधं हिरवं पान देखील पाहू शकत नव्हतो. आम्हाला इतर कैद्यांपासून वेगळं ठेवण्याची शिक्षा दिली गेली. विरोध नोंदवण्याची, प्रतिरोधाची शिक्षा. आम्ही ‘एल्गारवाले’ जेव्हा त्यांच्या अतार्किक नियमांना विरोध करतो, तेव्हा खूप जास्त दुखावले जातात ते. मग खूनशी वृत्तीने वागत राहतात आमच्यासोबत. मग कधी कुटुंबीयांनी, वकिलांनी पाठवलेली पत्र मधल्या मध्येच गायब करतात तर कधी अवाजवी निर्बंध लादून भेटीसाठी आलेल्या नातलगांना अकारण भेट नकारतात, गौतम नवलखांसाठी कुटुंबीयांनी पोस्टाने पाठवलेला चष्मा नकारून तो परत पाठवणे, फादर स्टॅन्ड स्वामींना सिपर स्ट्रॉ नाकारणे, सुरेंद्र गडलिंग यांची आयुर्वेदिक औषध अडवणे, रमेश गायचोर यांची वापरात असलेली मच्छरदाणी ऐन पावसाळ्यात हिसकावून घेऊन जाणे, एल्गारवाल्यांना पॉलिटिकल लीगल विषयांवरील पुस्तके वापरण्यास रोखणे अशा कैक प्रकारची अडवणूक अत्यंत शांत व कुटील मेंदू नी केली जाते. मग या विरोधात आम्हाला पुन्हा दंड ठोकावे लागतात.
२०१४ नंतर कारागृहातील माहोल प्रचंड दूषित केला गेला आहे. धार्मिक द्वेषाच्या राजकारणाला भाजप सत्तेत आल्यापासून खतपाणी मिळाले आणि त्याचा स्पष्ट व तीव्र परिणाम तुरुंगातही झालेला पाहायला मिळतोय. अयोध्येत राम मंदिर उभारण्यामागचं संघीय नरेटिव्ह आज अशा बंद्याच्या ओठांवर आलंय ज्याला साधं लिहिता वाचता देखील येत नाही. कारागृहात धार्मिक ध्रुवीकरण वाढत चालले आहे. इथं एकाच बराकित मंदिर गल्ली व मज्जिद गल्ली तयार झाली आहे. धर्मा-धर्मांतला तणाव खूप जास्त वाढून गेलेला आहे. हे आमचे आणि ते त्यांचे असं स्पष्ट विभाजन बाहेरच्या प्रमाणे इथं तुरुंगातही बनून गेलंय. या सर्व प्रकाराला नियंत्रित करणे दूरच जेल प्रशासन यास खतपाणी घालतानाच दिसत आहे. आरएसएसच्या मित्र समविचारी संघटनांना कारागृहात पायघड्या अंथरूण आमंत्रित केलं गेलं आहे. गायत्री परिवार, स्वाध्याय परिवार यांसारख्या संस्था धार्मिक प्रवचनाच्या नावाखाली बंद्यांमध्ये धर्मश्रेष्ठता पेरून आपलं धर्मांधतेच स्लो पॉयजनिंग पॉलिटिक्स करत आहेत. इथं रोज लाऊड स्पीकरवर भजन गायली जातात. इथं बंध्यांना साधी लीगल एड सुविधा सुद्धा नीट मिळत नाही तिथे दररोज सकाळी ऑनलाईन भागवत गीता ऐकवली जात आहे. आम्ही आम्हाला जमेल तसे संविधानाच्या समता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही मूल्यांबद्दल प्रबोधन करतो, कायदेशीर मदत पुरवतो, तिथे प्रशासन मात्र कैद्यांना धार्मिक जातीय विषयात व्यस्त ठेवू पाहतोय. मात्र ही आमच्याबाबतची सकारात्मकता जेल प्रशासनाला चांगलीच खटकत राहते. तेव्हा मग जेल प्रशासन आमची बदनामी करत सांगत राहतो, ‘एल्गारवाले देशद्रोही लोक आहेत त्यांच्या नादाला लागू नका,नाहीतर बिघडून जाल’. सुधारणे आणि बिघडणे या संकल्पनांचा चांगलाच घोळ तुरुंगव्यवस्थेत घातलेला दिसून येतो. म्हणजे तुरुंगाला सुधारगृह असं म्हटलं जातं आणि तुरुंग प्रशासनाच्या जिथं तिथं सुधारणा आणि पुनर्वसन असं लेबल दिमाखात मिरवलं जातं. पण बंद्यांची सुधारणा करायची म्हणजे नेमकं काय या समजदारीचा प्रचंड अभाव इथं दिसून येतो. कायदा मोडून बेकायदेशीर वागल्याने तुरुंगात आलेला बंदी इथल्या अमानुष वातावरणात सतत हाच विचार करत राहतो, की इथल्या प्रशासनाच्या बेकायदेशीर वागण्याला, कायदे मोडून भ्रष्ट वागण्याला शिक्षा देणारं कुणीच कसं नाहीये ? कुठल्याच यंत्रणेचा, शासकीय संस्थेचा कसलाच धाक नाहीये या तुरुंगावर. त्यामुळे एकदम मोकाटपणे तुरुंग प्रशासन इथल्या बंद्यांसोबत अमानवीय पद्धतीने सालोसाल वागत राहते. सुधारगृह हे गोंडस नाव असलेल्या या तुरुंगात सुधारण्याची गरज नेमकी कुणाला आहे, गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या व्यक्तीला की, गुन्हेगार घडवणाऱ्या या शासन यंत्रणेला, राज्यव्यवस्थेला ? ज्या जातीय सरंजामी नफेखोर भ्रष्ट मानसिकतेत इथले जेल अधिकारी उदामपणे वावरत असतात, त्यांनाच खऱ्या अर्थाने सुधारण्याची गरज आहे असे मला वाटते.
दिड फुट रुंद आणि सहा फुट लांब असलेल्या आपल्या बिस्तरा नावाच्या दरीवर निपचित पडून बंदी रोज आपल्या अंतःकरणातला डोह उपसत राहतो आतल्या आत. गाळागत तळाला साचलेल्या आठवणी, समस्या, वेदना, जबाबदाऱ्या, परेशान्या रोज ढवळून ढवळून मनाच्या पटलावर आणत राहतो. कुणी आपआपल्या लहान लेकरांसाठी आसवं गाळत हुंदके देत असतो, तर कोणी जबाबदारी खांद्यावर आलेला पोरगा, आईच्या डोळ्यात पडलेल्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी मदत करता येत नसल्याने हदबल होतो, कुणी प्रेयसीच्या, पत्नीच्या जीवघेण्या विरहाने अस्वस्थ होतो तर कुणी आयुष्याची गोळा बेरीज करत चिंतामग्न असतो. अशा मुक्या कोलाहलात आत साचलेली वेदना जेव्हा बांध फोडते आणि कंठातून गीत बनवून बाहेर पडते तेव्हा हीच कारागृह नियमावली दरडावून सांगते की, ‘खबरदार!! शांतता पाळा!! कारागृहात गीत गाणे गुन्हा आहे’. खरंतर मी बऱ्याच दिवसांपासून गायलोच नाही इथे, आई म्हणते गात रहा पण खूप घुसमट होते माझी. क्रांतिकारकांनी लिहायचं, वाचायचं असतं, कारागृहात पुस्तक खरडायचे असतात,भगतसिंग, बिरसा, गांधी, व्हायचं असतं वगैरे कुणी सल्ले दिले की खूप टाळकं हलतं माझं. मला म्हणावं वाटतं इथे या व दाखवा तुमचं क्रांतिकारकत्व, पण नाही म्हणत मी असं काही त्यांना, कारण भावना वाईट नसते त्यांची पण परिस्थिती खरंच खूप वाईट आहे इथं. जमल तसं दुःख वेदनेच्या उमाळ्यावर लिहितो मी, पण खूप कमी लिहितोय सध्या. दोन युएपीएच्या खटल्यातला तुरुंगवासाचा तब्बल आठ वर्षांचा अनुभव साठला आहे माझ्याजवळ त्याची गोळा बेरीज करताना शेवटचे लिहिलं होतं मी,
‘जेल ने हमसे सब कुछ छिना
जेल ने हमसे सब कुछ छिना
मचलती हुई जवानी छीनी,
बदलता हुआ जमाना छिना,
जेल ने हमसे सब कुछ छिना,
गाव, गलिया, सासे, आजादी
घर की रोटी बहन की शादी
अपने भी छीने, सपने भी छीने
कहानी भी छिनी, फसाने भी छीने
दिल खोलू, अब सोचा रोलू
तो बहती आखो से अष्क भी छीना
सोचा जिलू उनके सहारे
तो यार भी छीने, और इश्क भी छीना‘.
तुरुंगांना माझ्या व्यक्तिगत आयुष्याला भगदाड पाडलेय, संसार रिलेशनशिप उध्वस्त केलीये. भविष्य प्रचंड अनिश्चित करून ठेवले. याचं दुःख, वेदना प्रचंड बोचऱ्या आहेत. आपल्या क्षमता आणि मर्यादांची ओळख पावला पावलावर होते इथं. मी माझ्या तत्वांवर, विचारांवर, चळवळीवर व गाण्यावर खूप प्रेम करतो आणि हो याचं प्रेमाखातीर मी आज पुन्हा तुरुंग पत्करलाय. मला आणि रमेश ला NIA च्या धूर्त अधिकाऱ्यांनी खोटे जबाब देण्यासाठी, आधी आमिश दाखवले व नंतर धमक्या दिल्या तेव्हाही हेच समजत होतं की आपण बडा पंगा घेत आहोत, आपली भूमिका आपल्याला तुरुंग कोठडीच देईल तरी देखील आम्ही ती भूमिका घेतली, पोलिसांच्या ऑफर नाकारल्या आणि तुरुंग पत्करला आहे, ज्याचा तीळमात्र पश्चाताप होत नाही आज.
तुम्हारा किमती नजराना
तुमको हो मुबारक हो
के मेरे खून मे अब भी
जंग का उबाल बाकी है
उसलो के हिफाजत की
किंमत गर आजादी है
तू दे दे कैद या मुझको
तू देदे सजाये फासी है
मी या ओळी जेव्हा व ज्या पॉलिटिकल समजदारीतून व भूमिकेतून लिहिल्या होत्या, तीच भूमिका व समजदारी आजही आहे. दमन दमवणूक करत असतं. मी देखील आज दमलोय खरा, पण हरलेलो नाही. तुरुंग मला मोडू पाहतोय आणि मी तुरुंगाला, या संघर्षाचा शेवट काय होईल मला माहित नाही, पण लढल्याच समाधान मिळेल हे नक्की. एल्गार चा खटला राजकीय हेतून प्रेरित आहे. हा खटला एका जनतेवरील राजकीय दमनाचाच भाग आहे, तेव्हा या विरोधात मिळेल त्या अयुधांनी आणि जमेल तसं लढनच भाग आहे आज.
तुरुंग शोषणावर आधारलेल्या भाजपच्या व्यवस्थेसाठी अत्यावश्यक गोष्ट बनलाय. आज लोकशाहीसाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष या तुरुंगात करकचून बांधलाय. मोदी सरकारच्या या काळात विरोधकांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगातच दाबले जात आहे. विरोधकांत या तुरुंगाच भय इतकं जास्त आहे की विरोधक स्वतःला सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधून घेऊ लागलेत. सामाजिक चळवळ, कार्यकर्ते भयग्रस्त आहेत. तुरुंग सत्ताधाऱ्यांचं विखारी हत्यार झालं आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही सुरक्षित आयुष्या ऐवजी तडजोडी ऐवजी तुरुंग स्वीकारलाय आणि त्यामुळे तुरुंगातील अपमान, अवहेलना, वेदना, अडचणी कितीही त्रासदायक असल्या तरी त्यांच्याशी लढण्याची मानसिकता घेऊन आम्ही ‘एल्गारवाले’ उभे आहोत आणि न्यायालयीन सत्याग्रहीन मार्गाने तुरुंगातील अत्याचारा विरोधात लढत आहोत. एल्गार बंद्यांना औषधोपचार मिळावेत, आमचे खाजगी पत्र तपासणी यंत्रणांना दाखवणे बंद करावे, फोन कॉल ची सुविधा मिळावी, हक्काचे पाणी द्यावे, मुलाखतीसाठी येणाऱ्या नातलगासाठी विश्रांतीगृह असावे अशा मागण्यांना घेऊन मी आठ दिवसांचे जेव्हा उपोषण केले, तेव्हा न्यायालयाने व मीडियाने दखल घेतल्याशिवाय कारागृह प्रशासन हललं देखील नव्हतं. चळवळीतील आमच्या सहकाऱ्यांनी हे तुरुंगात छेडलेल आंदोलन उचलून धरलं, मीडियाने प्रसिद्धी दिली, ज्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले होते. इथे आम्ही तुरुंगात बाहेरच्या सपोर्ट शिवाय कोणताही लढा रेटू शकत नाही. उपोषण असहकार यांसारखे मार्ग केवळ बाहेरच्या सपोर्टनेच कारागृहात यशस्वी ठरतात. आज एल्गार खटल्याला असलेले प्रसिद्धीचे वलय आणि चळवळीच्या मित्र परिवाराची मदत आम्हाला आत मध्ये जगण्याचे आणि लढण्याचे बळ देतेय, सोबत जर हे जिवलग मित्र नसते तर जगणं खूप कठीण झालं असतं. हा न्यायालयीन संघर्ष करण्यासाठी जर अनेक कायदेतज्ञ मंडळी नसती तर हा लढा खूप जड गेला असता.
तुरुंगाचं प्रयोजन मला माझ्या ध्येयापासून मला परावृत्त करणं आहे, मला तोडणं आहे आणि अजूनही मी तुटलेलो नाही. स्वातंत्र्याची आस तीव्र होत चालली आहे. सुटल्यानंतर काय काय करायचं या स्वप्नात चार वर्षे सरलीत. मला माझ्या प्रेयसी सोबत उन्मुक्त जगायचंय, आईच्या हातची मेथीची भाजी खायची आहे आणि टिपेचा सूर लावून पुन्हा डफावर थाप टाकायचीय. चार वर्षे झाली तुरुंगात, तुरुंगाचं लाल गेट कधी उघडणार आमच्या मुक्ततेसाठी, याची वाट पाहतोय चातकासारखी.